सांगली : शहर व परिसरात सध्या दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या आहेत. किरकोळ खरेदी-विक्रीच्या माध्यमातून टोळीमार्फत सांगलीत नोटा खपविण्यात येत आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेते, व्यापारी हैराण झाले आहेत.
सांगलीच्या गणेश मार्केटमधील व्यापाऱ्यांना याबाबतचा अनुभव आला आहे. काही महिन्यांपूर्वी भाजी बाजारात पाचशे, दोनशे व शंभर रुपयांच्या बनावट नोटा आढळून येत होत्या. आता व्यापारी पेठा, संकुलांमध्ये अशा नोटा खपविण्याचा फंडा गुन्हेगारांनी शोधला आहे. नोटा छापून त्या खपविणाऱ्या टाेळ्यांवर पोलिसांची जुजबी कारवाई झाल्यानंतर पुन्हा या टाेळ्या सक्रिय होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्राहक, व्यापारी यांनाच याबाबत सतर्कता बाळगावी लागत आहे. व्यापारी किंवा नागरिकांकडून बँकेत अशा नोटांचा भरणा करतेवेळी त्या बनावट असल्याचे आढळून येत आहे. सामान्यपणे या नोटा बनावट असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे त्या सहज चलनात येत आहेत. याचा मोठा आर्थिक फटका व्यापारी, किरकोळ विक्रेते यांना बसत आहे. त्यामुळे संबंधित टाेळीची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गणेश मार्केटमध्ये दोघांकडे नोटा
गणेश मार्केटमधील दोन व्यापाऱ्यांकडे अशा नोटा काहींनी खपविल्याची बाब समोर आली आहे. बँकेत भरणा करतेवेळी त्या बनावट नोटा असल्याचे दिसून आले. त्यामुळे विक्रेते हादरले आहेत.