लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : डोळ्यांचे पारणे फेडणारी मैदानावरील चपळता... फटक्यातली ताकद... शटलकॉकला अचूकतेने टिपणारी नजर अशा वैशिष्ट्यपूर्ण शैलीने बॅटमिंटनच्या कोर्टवर जादुई प्रयोग करत रसिकांच्या मनावर छाप सोडणारे नंदू नाटेकर म्हणजे सांगलीची शानच. सांगली हायस्कूलकडून क्रिकेटच्या मैदानात उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या नंदू नाटेकरांच्या हाती बॅडमिंटनचे रॅकेट आले आणि या रॅकेटमधून त्यांनी जागतिक स्तरावर अनेक भीमपराक्रम नोंदवले. क्रीडारसिकांच्या आयुष्याला फुलवणाऱ्या या खेळाडूने मात्र सदैव आपल्या मनात सांगलीच्या आठवणींचा कोलाज जपला.
रक्तातच खेळाचे वेड घेऊन नाटेकरांच्या कुटुंबातील सदस्य जन्माला आले. नंदू नाटेकर यांच्या आजोबांपासून क्रीडा परंपरा चालू झाली. त्यांचे वडीलही कुस्तीशौकीन व कुस्तीपटू होते. त्यांच्या आईसुद्धा बॅडमिंटन खेळत होत्या. पहिला मिश्र दुहेरी सामना त्यांनी त्यांच्या आईबरोबर रत्नागिरीत खेळला होता. त्यांचे मामा म्हणजेच सांगलीचे दिवंगत माजी नगराध्यक्ष देवीकुमार देसाईसुद्धा खेळाडू होते. नंदू नाटेकर यांचे बंधू श्रीनिवास नाटेकर यांनीही राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या आहेत. क्रीडा परंपरा लाभलेल्या घरात १२ जून १९३३ रोजी नंदू नाटेकरांचा जन्म झाला.
सांगलीत पाचवीपर्यंत त्यांनी सिटी हायस्कूलमध्ये व नंतर सांगली हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. शिक्षणापेक्षा अधिक रस खेळातच असल्याने त्यांची पावलेही तिकडेच वळली. क्रिकेट, व्हाॅलिबॉल, उंच उडी, बांबू उडी या खेळातही ते प्रवीण होते. सांगली हायस्कूलकडून त्यांनी १९४८-४९मध्ये क्रिकेटचा सामना खेळला. क्रिकेटच्या बॅटऐवजी जेव्हा त्यांच्या हाती बॅडमिंटनचे रॅकेट पडले तेव्हा त्यांनी क्रीडा क्षेत्रात आपल्या खेळाने चमत्कार घडवले. सांगली ही जशी जन्मभूमी होती तशी त्यांची कर्मभूमीही होती. सांगली जीमखान्यातून १९४४ ते १९४९ या काळातच त्यांच्या बॅडमिंटन करिअरला सुरुवात झाली. आमराईमधील ऑफिसर्स क्लबच्या बॅडमिंटन व टेनिस कोर्टवर खेळण्याचे स्वप्न त्यांनी लहानपणापासून बाळगले होते. त्यांचे हे स्वप्नही त्यांनी पूर्ण केले. १९५३मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी निधी गोळा करण्यासाठी त्यांचा प्रदर्शनीय सामना याठिकाणी झाला होता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ५३ एकेरी विजेतेपद, ४३ पुरुष दुहेरी विजेतेपद आणि ३८ मिश्र दुहेरी विजेतेपद तसेच मानाचा पहिला ‘अर्जुन पुरस्कार’ जिंकणाऱ्या नंदू नाटेकरांना सांगलीचा जीमखाना नेहमीच प्रिय राहिला.
चौकट
सांगलीच्या मातीशी नाळ जपली
सांगली हा त्यांचा भावनिकदृष्ट्या वीक पाॅईंट असल्याचे त्यांचे बंधू डॉ. श्रीनिवास नाटेकर यांनी सांगितले. सांगलीतील मित्रांना भेटणे, सांगली जीमखान्यात जाऊन गप्पा मारणे या सर्व गोष्टी त्यांनी अखेरपर्यंत जपल्या. नंदू नाटेकर हे आयुष्यभर त्यांचे मामा देवीकुमार देसाई यांना आदर्श मानत आले. त्यांच्याकडून खेळाची प्रेरणा त्यांनी घेतली. डॉ. भय्यासाहेब परांजपे, डॉ. शेखर परांजपे, डॉ. पी. जी. आपटे यांच्यासह अनेकांशी त्यांचे मैत्रबंध शेवटपर्यंत कायम होते.