सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या एका जलतरणपटूवर मगरीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. जलतरणपटूने कशीबशी मगरीच्या तावडीतून आपली सुटका करून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात जलतरणपटू जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने नदीत पोहायला जाणाऱ्या लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.
शरद जाधव असे मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जलतरणपटूचे नाव आहे. जाधव यांच्यासह आणखी काहीजण रोज सकाळी नदीत पोहायला जातात. नेहमीप्रमाणे आजही सकाळी ते माई घाट येथे पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. जाधव यांनी धाडस दाखवून मगरीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. मात्र, या हल्ल्यात जाधव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने नदीत पोहाण्यासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये भिती निर्माण झाली असून ताबडतोब या मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
याआधी सांगली जिल्ह्यात अंकलखोप येथे कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर मगरीने हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अजित गायकवाड असे तरुणाचे नाव आहे. ही घटना २ एप्रिल रोजी घडली. मयत अजितच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.