सांगली : पत्नीला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या तिच्या माहेरकडील मंडळींनी ज्ञानेश्वर गोपाळ बामणे (वय ४०, रा. बसर्गी, ता. जत) या जावयाचा लाकडी खांबाला डांबून बेदम मारहाण करुन निर्घृण खून केला.
सावळी (ता. मिरज) मिरज येथे शनिवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. मृत ज्ञानेश्वरने लोखंडी पाईप डोक्यात घातल्याने त्याची पत्नी गीतांजली (३०) ही गंभीर जखमी झाली आहे.
ज्ञानेश्वर बामणे याचा दहा वर्षापूर्वी सावळीतील अण्णासाहेब गंगाराम शिंदे यांची मुलगी गीतांजली हिच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना आदित्य (११) व पार्थ (८ वर्षे) ही दोन अपत्ये झाली. सावळीत उरुस सुरु आहे.
यासाठी ज्ञानेश्वर पत्नी व दोन मुलांसह आला होता. शुक्रवारी रात्री किरकोळ कारणावरुन त्याचा पत्नी गीतांजलीसोबत वाद झाला. त्यानंतर तो आर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री साडेबारा वाजता तो घरी आला.
गीतांजली झोपली होती. त्याने तिच्यासोबत झालेल्या वादाचा राग मनात धरुन घरातील लोखंडी पाईप घेऊन तिच्या डोक्यात घातली. ती जोरात किंचाळताच गीतांजलीचे वडील गंगाराम शिंदे व घरातील अन्य लोक जागे झाले. त्यावेळी ज्ञानेश्वर हातातील लोखंडी पाईप टाकून पळून जाण्याच्या तयारीत होता.
तेवढ्यात गंगाराम शिंदेसह घरातील सर्वांनी त्यास पकडले. त्याला घराबाहेर लाकडी खांबाला बांधून बेदम मारहाण केली. पहाटे तीनपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
गीतांजलीसह ज्ञानेश्वरला उपचारासाठी मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी ज्ञानेश्वरला मृत झाल्याचे घोषित केले. गीतांजलीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कुपवाड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ज्ञानेश्वरला कोणी, कोणी मारहाण केली, याची चौकशी केली जात आहे. त्यानंतर खून व खुनाचा प्रयत्न असे दोन स्वतंत्र दाखल केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.ज्ञानेश्वर रेकॉर्डवरीलज्ञानेश्वर बामणे हा जत पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न असे दोन गुन्हे दाखल आहेत. तो मजुरीचे काम करीत होता. सासरकडील मंडळींनी त्याचा खून केल्याचे समजताच बसर्गीतील नातेवाईकांनी मिरज शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. विच्छेदन तपासणीनंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.