कासेगाव/कामेरी : वाळवा तालुक्यात कामेरी व कासेगाव येथे स्वाइन फ्लूने दोघांचा, तर एकाचा स्वाईन फ्लूसदृश तापाने मृत्यू झाल्याने दोन्ही गावांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मृतांच्या घरांमध्ये तसेच परिसरात रॅपीड सर्व्हे केला आहे. प्रतिबंधात्मक औषधोपचारही सुरू करण्यात आले आहेत.
कामेरी येथे शनिवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सुग्राबी अब्दुलअजीज संदे (वय ६५) यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. संदे यांना आठवड्यापूर्वी सर्दी, खोकला, ताप असा त्रास जाणवत होता. त्यांनी गावातील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र त्रास कमी झाला नाही. १९ सप्टेंबरला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू केले. तेथून त्यांना इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. शनिवार, दि. २२ रोजी उपचार सुरूअसतानाच त्यांचा मृत्यू झाला.
कामेरी येथील शिवाजी पेठेतील विष्णू ऊर्फ बबन धोंडी पाटील (वय ७४) यांनाही चार दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यांच्यावरही कामेरीतील खासगी रुग्णालयात व नंतर येथे उपचार सुरू होते. त्यांचेही रविवारी २३ सप्टेंबर रोजी त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. त्यांचा ताप कोणत्या प्रकारचा होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
सलग दोन दिवसात दोघांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मृत रुग्णांच्या परिसरातील घरांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. योग्य ती दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. अंबाबाई मंदिर परिसरात व माळ भागात राहणाऱ्या लोकांची आरोग्य तपासणी व सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, मळमळ अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरी पाटील, डॉ. सी. बी. पाटील यांनी केले आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साकेत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळलेल्या तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना या रुग्णांच्या घराशेजारील तापसदृश रुग्णांवर लक्ष ठेवणे व साध्या प्लूची लक्षणे आढळून आली तरी योग्य ते उपचार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्वाइन फ्लूबाबत प्रबोधन करण्यासाठी तालुकास्तरावरुन माहितीपत्रकाचे वाटप केले जाणार आहे.कासेगावातही साथ
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील मंगल शंकर मदने (वय ५५) या महिलेचा स्वाइन फ्लूने रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे ग्रामस्थांतून घबराटीचे वातावरण आहे. आठवड्यापूर्वी त्यांना इस्लामपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. संबंधित डॉक्टरांनी त्याच्या चाचण्या घेतल्या असता, त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राणोजी शिंदे यांनी ग्रामस्थांनी भीती बाळगू नये. गावात सर्व्हे सुरू असून, सावधानता बाळगावी, असे आवाहन केले.