सांगली : केंद्रातील भाजप सरकारमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात अडचणी येत आहेत. सरकारने मनावर घेतले तर काही दिवसांतच आरक्षणाचा विषय निकाली निघू शकतो असा दावा मराठा स्वराज्य संघाने केला. केंद्राच्या अडवणुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ संघाच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन चौकात गांधी पुतळ्यासमोर निदर्शने केली.संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. ते म्हणाले, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मराठा समाजाला त्रास सहन करावा लागत आहे. आरक्षणाचे राज्याचे हक्क काढून केंद्राकडे घेतले आहेत, त्यामुळे राज्य सरकार हतबल आहे. तरीही आरक्षणाचा विषय राज्य सरकारवर ढकलला जात आहे.
यातून मराठ्यांना आरक्षण देण्यात भाजप सरकारला रस नसल्याचे स्पष्ट होते. पण आमचा रस्त्यावरील लढा सुरुच राहील. आरक्षण मिळेपर्यंत मराठे स्वस्थ राहणार नाहीत. भाजपला ताकद दाखवून देऊ.ते म्हणाले, मोदी सरकारमुळे देशाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. देश कोरोनाच्या संकटात लोटला गेला आहे. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. इंधन दरवाढीने जनता मेटाकुटीला आली आहे. बड्या भांडवलदारांची तुंबडी भरण्यात मग्न असणाऱ्या सरकारला सामान्य लोकांच्या जगण्यामरण्याशी काहीही देणेघेणे नाही.आंदोलनात संघाचे शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, पंडित पाटील, चंद्रकांत जाधव, नितिन शिंदे, मंदार सूर्यवंशी, सुनील दळवी, सतिश पाटील, कृष्णा खांडेकर, बापू सूर्यवंशी, पी. आर. पाटील, दीपक मुळीक, गोपाळ पाटील, विशाल दळवी आदींनी भाग घेतला.
संघाच्या मागण्या अशा : मराठ्यांना त्वरीत आरक्षण द्यावे, महागाई, बेरोजगारी कमी करण्यासाठी पावले उचलावीत, कोरोना हाताळण्यात अपयश आल्याने लाखोंचे मृत्यू झाले. मृतांच्या कुटुंबियांना भरपाई द्यावी.