सांगली : शहरातील घनश्यामनगर व रमामातानगर परिसरातील दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला केवळ डेंग्यू हेच एकमेव कारण नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले असून, त्यांना मधुमेह, किडनी व लिव्हरचे आजारही होते, असे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. चारुदत्त शहा यांनी सांगितले. यापूर्वी डेंग्यूने मिरजेतील दोघांचा बळी गेला आहे. आता बळींची संख्या चारवर पोहोचली आहे. सांगलीत बुधवारी रात्री घनश्यामनगर येथील सुरेश मनगुळी (वय ३७) व रमामातानगर येथील रमजान सय्यद (२७) या दोघांचा मृत्यू झाला. त्या दोघांना डेंग्यू झाल्याची चर्चा महापालिकेत सुरू होती. मनगुळी यांना काही दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते; पण त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, रात्री त्यांचे निधन झाले. नातेवाइकांनी डेंग्यूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रमामातानगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यूची साथ आहे. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण या परिसरातच आढळून आले आहेत. अशातच बुधवारी सायंकाळी रमजान सय्यद या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला. रमजान हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यालाही भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शहरात डेंग्यूने दोघांचा बळी गेल्याचे समजताच महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली. गुरुवारी रमामातानगर परिसरात आरोग्य विभागाने औषध व धूळ फवारणी मोहीम हाती घेतली. तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. या परिसरातील एका शाळेजवळ कचऱ्याचा कंटेनर ठेवण्यात आला आहे. हा कंटनेर भरून वाहतो, तरीही त्यातील कचरा उचलला जात नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली. घनश्यामनगर परिसरातही पालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)डेंग्यूसह इतर आजार : चारुदत्त शहासुरेश मनगुळी व रमजान सय्यद या दोघांवरील उपचाराचे रिपोर्ट महापालिकेने घेतले आहेत. दोघांनाही मधुमेहाचा त्रास होता. मनगुळी यांना किडनी, तर सय्यद यांना लिव्हरचा आजार होता. दोघांवरही उपचार सुरू होते. मनगुळींच्या रिपोर्टमध्ये डेंग्यूसदृश्य ताप, तर सय्यद यांना डेंग्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. चारुदत्त शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महापालिकेवर फौजदारी करणार : पठाणमहापालिकेतील आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे रमजान सय्यद यांचा मृत्यू झाला. रमामातानगर परिसरात डेंग्यूने थैमान घातले असताना पालिकेने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. सय्यद यांच्या मृत्यूनंतर मात्र पालिका जागी झाली आणि गुरुवारी औषध फवारणी करून साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडले. सय्यद यांची प्रकृती खालावली असताना आरोग्य विभागातील एकाही अधिकाऱ्याने त्यांची भेट घेऊन विचारपूस केली नाही. यातून महापालिकेतील अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून येतो. सय्यद यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे नगरसेवक आयुब पठाण यांनी सांगितले.
सांगलीत डेंग्यूने दोघांचा मृृत्यू!
By admin | Published: August 12, 2016 12:05 AM