वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच राहणार चांगली - अशोक चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 04:49 PM2023-08-18T16:49:35+5:302023-08-18T16:50:03+5:30

'मित्रपक्षाशी आघाडी करून फसलो'

Sangli developed by Vasantdada Patil will remain well with the Congress says Ashok Chavan | वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच राहणार चांगली - अशोक चव्हाण 

वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच राहणार चांगली - अशोक चव्हाण 

googlenewsNext

सांगली : सर्वांना सामावून घेणारा, चांगल्या विचारधारेने चालणारा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे वसंतदादा पाटील यांनी विकसित केलेली सांगलीकाँग्रेसकडेच चांगली राहील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

संजयनगर येथे गुरुवारी काँग्रेस मेळावा तसेच आरोग्यवर्धिणी केंद्राचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर किशोर जामदार, कांचन कांबळे, उपमहापौर उमेश पाटील, नगरसेवक मनोज सरगर, संतोष पाटील, रोहिणी पाटील, युवा नेते जितेश कदम, आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची जोडी आगामी निवडणुकीत झपाटून काम करेल. ती बिनतोड ठरेल. देशाचे वातावरण बदलत आहे. कर्नाटकात लोकांनी भाजपला हादरा दिला. तिथे आता स्थिर आणि गतिमान सरकार आले. महाराष्ट्रात मात्र स्पष्ट बहुमत असताना फोडाफोडी केली जात आहे. लोकशाहीचा गळा घोटला जातोय. आमचं राजकारण असं नाही. आम्ही भाजपच्या तोंडाला फेस आणू. सांगलीत विश्वजित, विशाल, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांच्या भक्कम एकजुटीला जनतेने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मित्रपक्षाशी आघाडी करून फसलो

विश्वजित कदम म्हणाले, महापालिकेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसने नाईलाज म्हणून मित्रपक्षाशी आघाडी केली, मात्र आम्ही फसलो. त्याची किंमत मोजावी लागली. संजयनगरने मात्र स्पष्ट साथ दिली.

आम्ही ७५ नगरसेवक निवडून आणू

विशाल पाटील म्हणाले, जिल्ह्यातील काँग्रेस आता थांबणार नाही. राष्ट्रवादीचा उर्वरित गट फुटला तरी आम्ही ७५ नगरसेवक निवडून आणू, एवढी ताकद इथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांत आहे. जाती-धर्मात भांडण लावून जिंकणे एवढाच भाजपचा कार्यक्रम आहे.

‘हात’ असता तर चित्र वेगळे असते

विशाल पाटील म्हणाले, दहा वर्षे खासदार राहिलेल्या नेत्याने या भागासाठी एक रुपयाचा निधी दिला नाही. त्याचे परिणाम म्हणून आता त्यांच्या हाताला पुन्हा लोकसभा लागणार नाही. गेल्या निवडणुकीत हात चिन्ह असते तर वेगळे चित्र असते, यावेळी ते दिसेल.

Web Title: Sangli developed by Vasantdada Patil will remain well with the Congress says Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.