सांगली : तथाकथित गोरक्षकांनी गोहत्येचा कांगावा करीत धार्मिक संघर्षाचे बीज पेरण्याचा कार्यक्रम हाती घेतला असतानाच, एका मुस्लिम कुटुंबाने त्यांच्या देशी गाईचे हिंदू पद्धतीने डोहाळे जेवण घालून भेदाच्या भिंतींना भगदाड पाडले आहे. त्यांच्या गोसेवेची ही कहाणी गावातून तालुक्यात आणि तालुक्यातून जिल्ह्यात व्हायरल झाली आहे.
लोकरेवाडीच्या इलाही पठाण या मुस्लिम कुटुंबाने एकाचवेळी प्राणीप्रेमाचा आणि धार्मिक एकतेचा नवा मंत्र समाजाला दिला आहे. धनश्री नावाच्या आपल्या देशी गाईचे हजारभर लोकांना निमंत्रित करून अगदी पोटच्या लेकीप्रमाणे डोहाळे जेवण घातले. गाय फक्त हिंदूंची असा विचार करणाºया मुस्लिमांना आणि पोकळ गोरक्षक म्हणून मिरवणाºया हिंदूंनाही या चपराक देत मानवता व सर्वधर्म समभावाचा संदेश त्यांनी दिला आहे.
लोकरेवाडी हे तासगाव तालुक्याचे शेवटचे सहाशे ते सातशे लोकसंख्येचे गाव. गावातील एकच मुस्लिम कुटुंब म्हणजे इलाही दस्तगीर पठाण. शहाबुद्दीन व सलीम या दोन मुलांसह दहाजणांचे समाधानी कुटुंब.! इलाही हे आचारी काम करतात, शहाबुद्दीन भंगाराच्या दुकानात कामाला आणि सलीम एका खासगी कंपनीत काम करतात. शहाबुद्दीन तीन वर्षांपूर्वी डोंगरात जनावरे हिंडवायला गेला असताना, दीड वर्षाचे देशी गाईचे जखमी वासरु मरणाच्या दारात असल्याचे त्यांना दिसून आले. त्याला घरी आणून डॉक्टरला बोलावून जखमी त्याच्या पायावर उपचार केले. वासरू घरादारात बागडू लागल्यानंतर घरच्या सर्वांचाच त्याचा लळा लागला. ती दावणीला आल्यावर घरातले सर्व सुरळीत झाले. त्यामुळे तिचे नाव त्यांनी धनश्री ठेवले.
हीच धनश्री आता मोठी होऊन गर्भवती झाल्यानंतर तिचे डोहाळे जेवण घालायचा निर्णय त्यांनी घेतला. २९ सप्टेंबरचा हा मुहूर्त ठरला आणि त्यांनी निमंत्रणे धाडली. नातेवाईक, शेजारी, गावकरी अशा सर्वांनी त्यांना प्रश्न केला, डोहाळे जेवण कोणाचे? गाईचे डोहाळे जेवण हे उत्तर मिळाल्यानंतर या भन्नाट कार्यक्रमाबद्दल सुरुवातीला आश्चर्य, नंतर उत्सुकता आणि शेवटी कुटुंबाप्रती अभिमानाच्या भावनांनी जन्म घेतला. दारात मांडव, स्पिकरवर गाणी, एकीकडे स्वयंपाकाची तयारी असा सर्व काही थाट याठिकाणी लोकांनी अनुभवला.
कुटुंबियांना सलाममुहूर्तावर म्हणजे १२ वाजून ५ मिनिटांनी धनूची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. गळ्यात नारळाने भरलेली ओटी बांधली. वाजत-गाजत हा कार्यक्रम पार पडला. जेवणाचा आस्वाद घेत पाहुणेमंडळी निघून गेले, पण धार्मिक सलोख्याची, समभावाची, माणुसकीची, प्राणीप्रेमाची तृप्त ढेकर सर्वांनी दिली आणि पठाण कुटुंबियांना एक सलामही केला.अशी नटली लाडकी लेक..मेहंदी म्हणून शिंगांना लावलेला कलर, चारी पायात फुलांच्या माळा... कपाळावर काळी चंद्रकोर, डोळ्यात काजळ, गळ््यात नवा कंडा, पायात काळा दोरा, गळ्यात घुंगराची माळ, तोंडाला नवी म्हुरकी, डोक्यात दारक, शिंगात शिंगदोर, लाल रेबिन्स असा साजशृंगार करून धनश्रीला सजविले होते. हिरव्यागार काकणांचा चुडाही दोन्ही शिंगात भरला होता..