सांगली : श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान व रॉयल कृष्णा बोट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संभाव्य महापूर आपत्ती नियोजन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी दिली.
चौगुले यांनी सांगितले की, सांगलीत २०१९ च्या महापुरामध्ये खूप मोठे नुकसान सहन करावे लागले होते. हजारो घरांना पुराच्या पाण्याने वेढले होते. अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आले होते. ब्रह्मनाळमधील दुर्घटना सर्व महाराष्ट्राला हादरवून गेली होती. या महापुरामध्ये पोलीस, एनडीआरएफ, आर्मी व नेव्हीच्या जवानांसोबत खांद्याला खांदा लावून आम्ही महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचाव कार्यामध्ये सहभाग घेतला होता. सांगलीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते या बचावकार्यात सहभागी झाले होते. मात्र बऱ्याच जणांची इच्छा असूनही या बचाव कार्यात योग्य प्रशिक्षणाअभावी सहभागी होऊ शकले नाहीत. यावर्षीसुद्धा हवामान खात्याने १०० टक्के पावसाची शक्यता वर्तवली असल्याने पुन्हा एकदा सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानमार्फत आपत्ती नियोजन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी रॉयल कृष्णा बोट क्लबचे अनेक राष्ट्रीय खेळाडू, सा. मि. कु. महानगरपालिका अग्निशमन दल व भूलशास्त्र तज्ज्ञ संघटनेतर्फे डॉ. मोहन पाटील, डॉ. स्मिता ऐनापुरे, डॉ. विनायक पाटील व डॉ. गणेश चौगुले हे प्रात्यक्षिक दाखवून, प्रशिक्षण व मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी अजित टिके व सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर हेही मार्गदर्शन करणार आहेत.