- संतोष भिसे सांगली - लॉकडाऊन आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात बसस्थानकांवरील परवानाधारक वाणिज्य आस्थापनांना परवाना शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ मुंबई, पुण्यासह राज्यभरातील हजारो व्यावसायिकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
लॉकडाऊनमध्ये सुमारे दोन वर्षे एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरु नव्हती. यापैकी वर्षभर तर पूर्णत: बंद होती. या काळात प्रवासीच नसल्याने स्थानकांतील व्यावसायिकांचा व्यवसाय बंद राहिले होते. उपहारगृहे, बेकरी, रसगृहे, लॉटरी सेंटर्स, फोन बुथ आदी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या स्थितीत एसटीचे परवाना शुल्क मात्र कायम होते. ते रद्द करण्याची मागणी राज्यभरातून होत होती. तोट्यात असलेल्या महामंडळाने त्याला मान्यता दिली नाही. हा विषय बैठकीत चर्चेला आला असता सकारात्मक निर्णय झाला. त्यामुळे गाळेधारकांना दिलासा मिळाला आहे.
सांगली विभागातील अनेक गाड्या दोन वर्षे जागेवरच थांबून राहिल्याने नादुरुस्त झाल्या आहेत. काही गाड्या नुकत्याच भंगारात काढण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर पुणे व सांगली विभागांसाठी मिळून १८० नव्या गाड्या उपलब्ध होणार आहेत. सीएनजी गाड्यांसाठी पुरेशा संख्येने चेसिस उपलब्ध होत नाहीत, शिवाय सीएनजी पंपांची संख्याही कमी आहे, त्यामुळे डिझेल गाड्या घेतल्या जाणार आहेत. बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.