सांगली, दि. १६ : सांगली जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून कडेगाव, शिराळा, तासगाव, वाळवा, खानापूर तालुक्यात दुपारी १२ वाजेपर्यंत ४१ टक्केपर्यंत, तर जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर तालुक्यात ३० ते ३६ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यात सरासरी ३६.३१ टक्के मतदान झाले असून कडेगाव तालुक्यातील कमळापूर येथे काँग्रेस आणि भाजपच्या दोन गटात किरकोळ वादावादीचे प्रकार झाले. उर्वरित ठिकाणी शांततेत मतदान चालू असून बहुतांशी मतदान केंद्रावर महिला व युवकांच्या रांगा लागल्या आहेत. युवकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे चित्र आहे.सर्वच तालुक्यात दुपारी १२ वाजेपर्यंत घेतलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. खानापूर तालुक्यात ३६ टक्के मतदान झाले आहे. बामणी केंद्रावर महिलांच्या रांगा लागल्या आहेत. कडेगाव तालुक्यात ३९ टक्के मतदान झाले असून कमळापूर मतदान केंद्रावर काँग्रेस आणि भाजपच्या दोन गटात वादावादीचे किरकोळ प्रकार झाले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा संघर्ष टळला.
आटपाडी तालुक्यात ३२ टक्के मतदान झाले असून बहुतांशी गावांमध्ये चुरस दिसून येत आहे. हितवडमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वाधिक ४८ टक्के मतदान झाले. मिरज तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत असलेल्या माधवनगरमध्ये मोठ्या चुरशीने मतदान चालू आहे. येथे ३७ टक्के मतदान झाले असून मतदान केंद्रांवर महिला, तरूणांच्या मोठ्या रांगा आहेत. बुधगाव, दुधगाव येथेही मतदानासाठी गर्दी दिसून येत असून येथे ५२ टक्के मतदान झाले आहे.
युवक कार्यकर्ते मतदारांना दुचाकी व चार चाकी गाडीतून मतदानासाठी घेऊन येताना दिसत आहेत. शिराळा तालुक्यात २५ टक्के मतदान झाले असून येळापूर येथे सर्वाधिक ७५ टक्के मतदारांनी हक्क बजाविला. वाळवा तालुक्यात सरासरी ३९ टक्के मतदान झाले असून बागणी, कोरेगाव, वाळवा मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. जत, तासगाव तालुक्यातही २५ ते २९ टक्के मतदान झाले आहे.