सांगली,१२ : जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस दलाकडून पावले उचलली जात आहेत. गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रातील अवैध धंदे, गुन्हेगारी टोळ्या, मारामारी अशा गंभीर गुन्ह्यांतील २० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील आणखी ३९ टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाईल, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की, सांगली पोलिसांकडून गुन्हेगारी टोळ्यांची पाळेमुळे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. या टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सांगलीचे जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी मटक्यातील १५३ जणांवर तडिपारीची कारवाई केली आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगार, अवैध धंदेवाले यांच्यावर कारवाई झाली आहे. यंदा तीन टोळ्यांतील ३८ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. आणखी ३९ टोळ्यांचा प्रस्ताव आहे.
खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या खुनात माजी नगरसेवक सचिन सावंत याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही. अनेक टोळ्यांकडून गुन्हेगारीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.
१४ ते १८ वयोगटातील या अल्पवयीन गुन्हेगारांत सुधारणा करण्यासाठी युथ पार्लमेंटरी हा उपक्रमही हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत कोल्हापूर परिक्षेत्रात विविध स्पर्धा घेण्यासाठी पोलिस महासंचालकांनी ३५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. मुली, महिलांची छेडछाड करणाºया १८ हजार १२९ तरुणांवर निर्भया पथकाने कारवाई केली असून, त्यात सांगली जिल्ह्यातील ४७३९ तरुणांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.