सांगली : कृषि विभागाने संयोजन समितीच्या सर्व सदस्यांशी समन्वय ठेवून नियोजित जिल्हा कृषि महोत्सव यशस्वी करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिल्या.
इस्लामपूर येथे दिनांक 27 ते 31 जानेवारी 2018 या दरम्यान जिल्हा कृषि महोत्सव आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासंदर्भात प्राथमिक नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक सुरेश मगदूम, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक एल. पी. धानोरकर, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय प्रदीप सुर्वे, अग्रणी जिल्हा बँकेचे लक्ष्मीकांत कट्टी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कृषि विस्ताराला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी व अन्य शेतकऱ्यांच्या विचारांची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा कृषि महोत्सवच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होईल. तसेच, यातून शेतकऱ्यांच्या आत्मविश्वास वृद्धिंगत होईल.
आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होईल आणि जागतिक पातळीवर स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिद्ध करू शकतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, प्रस्तावित जिल्हा कृषि महोत्सवात शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषि योजना, उपक्रम, संशोधित कृषि तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषि पूरक व्यवसाय इत्यादिंबाबतचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे.
कृषि प्रदर्शनाबरोबरच कृषि परिसंवाद, अनुभवी शेतकरी, उद्योजक यांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंतांची भेट घडवावी व सामान्य शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन होणे अपेक्षित आहे.
उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव तसेच, फळे, फुले व भाजीपाला महोत्सवाचेही आयोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी नियामक मंडळाच्या समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी पार पाडावयाच्या जबाबदारीचे नियोजन करण्यात आले. महोत्सवामध्ये जवळपास 200 स्टॉल्स उभे करण्यात येणार आहेत.
महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच आपत्कालीन यंत्रणा इत्यादिबाबत सतर्क राहावे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीस जिल्हा परिषदेच्या संबंधित यंत्रणा, कृषि संबंधित महामंडळे, बँका, आरोग्य विभाग आदि उपस्थित होते.