सांगली : जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि संचालकांतील मतभेद टोकाला गेले असून, याबद्दल नाराज संचालकांची शुक्रवारी आष्टा येथे बैठक झाली. अध्यक्ष पाटील आणि उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने बदलाची मागणी बैठकीत झाली. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असे संचालकांनी स्पष्ट केले असून, याबाबत ज्येष्ठ संचालक राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे शनिवारी आ. पाटील यांची भेट घेणार आहेत.
आष्टा येथे विलासराव शिंदे यांच्या निवासस्थानी जिल्हा बँकेच्या पदाधिकारी बदलाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार अनिल बाबर, बी. के. पाटील, शिकंदर जमादार, सुरेश पाटील, बाळासाहेब होनमोरे, प्रतापराव पाटील, कमल पाटील या संचालकांसह प्रमुख नेते उपस्थित होते.
जिल्हा बँकेत मागील काही दिवसांपासून अध्यक्ष आणि संचालकांत धुसफूस सुरू आहे. अध्यक्ष पाटील संचालकांना विश्वासात घेऊन काम करीत नसल्याचा आरोप काही संचालक सातत्याने करीत आहेत. त्यातूनच २७ एप्रिलच्या संचालक मंडळाच्या बैठकीला संचालक गैरहजर राहिले. संचालकांच्या अनुपस्थितीने बैठक पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या बैठकीकडेही संचालकांनी पाठ फिरविली. दि. १४ मेरोजी झालेल्या बैठकीला केवळ सात संचालक उपस्थित होते. काही संचालकांनी बैठकीनंतर येऊन सह्या केल्या.
काही संचालकांनी पदाधिकारी बदलाबाबत परस्पर बैठक घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या संचालकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी आष्ट्यात बैठक झाली.अध्यक्ष पाटील आणि उपाध्यक्ष देशमुख यांना तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सलग तीन वर्षे त्यांच्याकडून उत्तम कारभार झाला. परंतु अन्य संचालकांना पदाधिकारीपदी संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका काही संचालकांनी मांडली. इतरांनाही अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची संधी मिळाली पाहिजे, त्याबाबत आ. जयंत पाटील यांच्याकडे मागणी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. आ. पाटील पदाधिकारी बदलाबाबत जो निर्णय देतील, तो मान्य केला जाईल, असे सर्वांनीच स्पष्ट केले. सर्व संचालकांच्यावतीने विलासराव शिंदे शनिवारी (दि. १९) जयंत पाटील यांना भेटणार आहेत. पदाधिकारी बदलाबाबतचा चेंडू जयंतरावांच्या कोर्टात ढकलण्यात आल्याने त्यांच्याकडून कोणता निर्णय होणार, याबाबत संचालकांत उत्सुकता आहे.
संचालकांची मते जयंतरावांपुढे मांडणार : विलासराव शिंदेजिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बदलाबाबत सलग दोन दिवस बैठका झाल्या. सत्ताधारी गटाच्या संचालकांशी पदाधिकारी बदलाबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे ज्येष्ठ संचालक विलासराव शिंदे यांनी सांगितले. बदलासाठी जयंत पाटील यांच्याकडे मागणी करणार असून, तो जो निर्णय देतील, तो सर्वांना मान्य होईल. बँकेच्या सर्व संचालकांना विश्वासात घेऊन काम करावे, अशी मागणीही काहींनी केल्याचे त्यांनी सांगितले.