अविनाश कोळी
सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी झाली तरी पाडापाडीच्या राजकारणावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत वाद पेटला आहे. संशयाच्या धुक्यातच आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार असून, यापुढेही असेच खटके उडण्याची व सत्तेची समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा बँकेचीनिवडणूक महाविकास आघाडीने लढविली. मात्र, काही गटांतील निवडणुकांनी दोन्ही काँग्रेसमध्ये एकमेकांविषयी संशयकल्लोळ निर्माण केला. जतमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार विक्रम सावंत यांचा पराभव काँग्रेससाठी धक्कादायक होता. तेथे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार व भाजपने उमेदवारी दिलेले प्रकाश जमदाडे निवडून आले. यात राष्ट्रवादीचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा संशय काँग्रेस नेत्यांना आहे. निकालापासून वातावरण शांत होते. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांनी एका कार्यक्रमात पतसंस्था गटातील किरण लाड यांच्या पराभवास काँग्रेस उमेदवाराला व नेत्यांना कारणीभूत ठरवत टीका केली. त्यानंतर विक्रम सावंत यांनीही जतमधील त्यांच्या पराभवाचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जत सोसायटी गट व पतसंस्था गटातील निवडणूक निकाल धक्कादायक ठरला. जतला काँग्रेसचे, तर पतसंस्था गटात राष्ट्रवादीचे नुकसान झाले. या दोन्ही जागा भाजपकडे गेल्या. सत्तेवर महाविकास आघाडी आली असली तरी पदाधिकारी निवडण्यापूर्वीच दोन्ही काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. उघडपणे दोन्हीकडील नेते एकमेकांवर आरोप करीत असल्याने भविष्यातील महाविकास आघाडीची वाटचाल एकत्रितपणे होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील व काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्यातही मतभेद निर्माण झाले आहेत. सद्य:स्थितीत दोन्ही काँग्रेसचे सूर जुळणे कठीण दिसत आहे.
पदांवरूनही वादाची चिन्हे
जिल्हा बँकेत अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर काँग्रेसने समान हक्क सांगितला आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत त्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, राष्ट्रवादी यासाठी तयार नाही. अध्यक्षपद स्वत:कडेच ठेवण्यावर राष्ट्रवादी ठाम आहे. उपाध्यक्षपदी काँग्रेस व शिवसेनेला समान संधी दिली जाण्याची शक्यता आहे.