सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारतोफा शुक्रवारी थंडावल्या. रविवारी (दि. २१) होणाऱ्या मतदानाकडे आता उमेदवार व नेत्यांचे लक्ष लागले आहे. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला असून, १८ जागांसाठी ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचाराची सांगता झाली असली तरी छुप्या प्रचाराला गती आली आहे. सोसायटी गटातील सहलीवर गेलेले मतदार शनिवारी संध्याकाळी परतण्याची शक्यता आहे.
सव्वा वर्ष लांबणीवर पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. महाविकास आघाडीने सहकार विकास पॅनेल, तर भाजपने शेतकरी विकास पॅनेल उभे केले आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे नेते महेंद्र लाड बिनविरोध निवडून आले. उर्वरित १८ जागांसाठी प्रचाराचे रान पेटले होते. यंदा जिल्हा बँकेच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप झाले नाहीत. मात्र शांततेत आणि चुरशीने प्रचार करण्यात आला.
जत, आटपाडी, मिरज या सोसायटी गटासह, ओबीसी, पतसंस्था गटात यंदा जोरदार चुरस आहे. त्यामुळे या गटांमध्ये ताकदीने प्रचार झाला. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी जत, आटपाडी व मिरज तालुक्यांत सभा घेतल्या. सभा, व्यक्तिगत भेटीगाटी, मोबाईलद्वारे संवाद अशा गोष्टींवर उमेदवारांनी भर दिला होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सर्वच गटांतील उमेदवारांनी दिवसभर प्रचाराची अंतिम फेरी पूर्ण केली. सोशल मीडियावरूनही मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता झाल्यानंतर आता छुपा प्रचार सुरू झाला आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा ४६ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांचे पॅनल मैदानात असले तरी काही अपक्षांनीही आव्हान निर्माण केले आहे. बँकेचे एकूण २५७३ मतदार आहेत. गटानुसार मतदारांच्या भेटी घेण्याचे काम उमेदवारांनी चिन्हवाटपानंतर सुरू केले होते. प्रचाराच्या दोन फेऱ्या उमेदवारांनी पूर्ण केल्या आहेत. काहींनी तीन फेऱ्याही केल्या आहेत. दूरध्वनीवरूनही संपर्क केला जात आहे. रविवारी २१ नोव्हेंबरला मतदान व २३ रोजी मतमोजणी होणार आहे.
तालुकानिहाय मतदान
आटपाडी १६०
क.महांकाळ १७२
खानापूर (विटा) १३२
जत १८९
तासगाव २३४
मिरज १६६
वाळवा २९७
शिराळा २१२
पलूस १८९
कडेगाव १५१
सांगली(मिरज) ४३६
एकूण २५७३