अशोक डोंबाळेसांगली : दुष्काळ, अतिवृष्टीच्या निधीवर जिल्हा बँकेच्या तासगाव तालुक्यातील शाखांमध्येच सहा ते सात कोटींवर कर्मचाऱ्यांनी डल्ला मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घोटाळ्यात १० कर्मचाऱ्यांचा सहभाग असून, बड्या संचालकांचा त्यांना वरदहस्त आहे. काही संचालकांच्या वरदहस्तामुळे कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये बिनधास्त पचविले आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक अशी ओळख आहे. या बँकेच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये २२० शाखा आहेत. उलाढाल १३ हजार कोटी रुपयांची असून, ठेवी सात हजार ९०५ कोटी रुपयांच्या आहेत. हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत. या बँकेत ठेवीदारांनी विश्वासाने ठेवी ठेवल्या आहेत. ग्रामीण भागात जिल्हा बँकच शेतकऱ्यांना आधार आहे; पण काही संचालकांच्या मनमानी कारभारामुळे बँकेतील कोट्यवधी रुपयांवर कर्मचारीच डल्ला मारत आहेत. तालुक्यातील आपले कथित राजकीय वजन अबाधित ठेवण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई काही संचालक करू देत नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेचे प्रशासन हतबल आहे. केवळ निलंबनाचे कागदी घोडे नाचवले जात आहेत. अपहारानंतरही ठोस कारवाई होत नसल्याने जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांची घोटाळे करण्याची हिंमत वाढली आहे. तासगाव तालुक्यात दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शासनाकडून आली आहे. काही शेतकरी मयत तर काही शेतकऱ्यांची जिल्हा बँकेकडे खाती नसल्यामुळे ते पैसे घेण्यासाठी फिरकले नाहीत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून बँकेच्या अनामत खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहेत. या निधीची फारशी चौकशी होत नसल्यामुळे चतुर कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारला आहे.सूत्राच्या माहितीनुसार जिल्हा बँकेच्या तासगाव तालुक्यातील शाखांमध्ये १० कर्मचाऱ्यांनीच जवळपास सहा ते सात कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, मिरज, खानापूर, कडेगाव, पलूस बँकांच्या शाखांमध्येही कर्मचाऱ्यांकडून अनामत रकमांवर डल्ला मारला असण्याची शक्यता आहे.
तीन वर्षांपासूनचा घोटाळादुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. पीक विम्याची मदतही शेतकऱ्यांना मिळते. शेतकऱ्यांच्या मदतीची सर्व रक्कम जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत अनामत खात्यावर ठेवली जाते; पण मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर न जाता बँकेतील कर्मचाऱ्यांनीच त्या रकमेवर टप्प्याटप्प्याने तीन वर्षांत लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे.
कर्मचाऱ्यांनी असा मारला डल्लाजिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत अनामत रकमेची खाती आहेत. या खात्यातून वारंवार व्यवहार होत नाहीत. याचाच गैरफायदा घेऊन या शाखेतील कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या खात्यावर टप्प्याटप्प्याने रक्कम वर्ग केली आहे. त्यातूनच तासगाव तालुक्यात जिल्हा बँकेच्या १० कर्मचाऱ्यांनी सहा कोटींवर रकमेवर डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती आहे.