सांगली : जिल्हा बॅंकेच्या सिद्धेवाडी (ता. तासगाव) शाखेत दुष्काळ मदत निधीमध्ये अपहारप्रकरणी शाखाधिकारी व्ही. एस. सूर्यवंशी यांच्यासह लिपिक एस. व्ही. कोळी यांना निलंबित करण्यात आले. तासगाव मार्केट यार्ड शाखेतील अपहाराची माहिती लपवल्याबद्दल तिघांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी ही माहिती दिली.शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीतील ७.७३ लाख रुपये रकमेवर कर्मचाऱ्यानेच डल्ला मारला आहे. याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शाखाधिकारी सूर्यवंशी यांच्यावर कारवाई करण्यात आली. कित्येक शेतकऱ्यांनी विविध अनुदानाच्या रकमा बॅंकेतून वर्षानुवर्षे काढलेल्या नाहीत. या रकमांचा अपहार करून त्या काढण्यात आल्याचा प्रकार तासगाव मार्केट यार्ड शाखेत पुढे आला. सिद्धेवाडी येथेही असा प्रकार निष्पन्न झाला. त्यामुळे सिद्धेवाडी शाखेची चौकशी अधिकाऱ्यांमार्फत झाडाझडती घेण्यात आली.त्यामध्ये लिपिक कोळी यांनी ७ लाख ७३ हजार रुपयांच्या दुष्काळी निधीवर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. कोळी यांनी दुसर्याचा पासवर्ड वापरल्याचेही आढळले. शाखाधिकारी व्ही. एस. सूर्यवंशी यांनी कोळी यांच्या कामावर लक्ष न ठेवता हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. त्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
तासगावमधील मार्केट यार्ड शाखेत दुष्काळ निधी अपहार झाल्याचे सर्वप्रथम आढळून आले. याप्रकरणी शाखाधिकाऱ्यांसह पाच जणांवर निलंबनाची कारवाई यापूर्वीच करण्यात आली आहे. अपहाराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. अपहाराची माहिती लपवल्याबद्दल जे. एस. डोंगरे, एस. ए. कुंभार आणि यू. एन. कांबळे यांची संख, उमदी आणि डफळापूर शाखेत तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.