सांगली : सांगली जिल्हा बॅँकेतील आक्षेपार्ह प्रकरणांच्या चौकशी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांची चौकशी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती रद्द करीत त्यांच्या जागी कराड येथील उपनिबंधक संदीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा बॅँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या गैरकारभाराबद्दल स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी तक्रार केली होती. याची दखल घेत शासनाने सुरुवातीला चौकशी समिती नियुक्त केली. त्यांच्या अहवालानुसार सहकार आयुक्तांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ (१) व नियम ७१ अन्वये चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांना दिले. सुरवसे यांनी अद्याप चौकशी सुरू केली नव्हती. तोपर्यंत त्यांच्या जागी कराडचे उप निबंधक संदीप जाधव यांची नियुक्ती केली आहे. याबाबते आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहे. लवकरच ही चौकशी सुरू करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
या प्रकरणांची चौकशी होणारतांत्रिक पदांची तसेच लिपिक पदांची नोकरभरती, मागील संचालक मंडळाच्या शेवटच्या काळातील ठराव, केन ॲग्रोसह महांकाली व अन्य कारखान्यांना दिलेले कर्ज, सरफेसी कायद्यांतर्गत थकबाकीदार सहा संस्थांची मालमत्तांची खरेदी आदी प्रकरणांचा चौकशीत समावेश आहे.
शासन प्रतिनिधी असल्याने अधिकारी बदललेजिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सांगितले की, बॅँकेच्या चौकशीचे आदेश मला दिले होते. मात्र या बॅँकेच्या संचालक मंडळात शासन प्रतिनिधी म्हणून मी सहभागी आहे. न्यायालयाच्या एका निर्णयानुसार जे अधिकारी ज्या बॅंकांत शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम बघतात त्यांना त्या बॅंकांची चौकशी करता येत नाही. यामुळे शासनाने माझ्या जागी अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
कलम ८३ अंतर्गत चौकशी करून अहवाल सादरचे आदेश मला दिले आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात चौकशी सुरू करणार आहे. यानंतर या बॅँकेची कलम ८८ अंतर्गत चौकशी करावी की नाही, याबाबतचा अभिप्राय शासनाला सादर करणार आहे. - संदीप जाधव, उप निबंधक (सहकार), कराड