सांगली : गतवर्षी दुष्काळ तर यंदा अति पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा दुहेरी अडचणीच्या परिस्थितीत जिल्हा बँक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. एकरकमी परत कर्ज फेड योजनेसह विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यामध्ये आणखी भर म्हणून बँकेने विकास सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी विना परतावा दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहे, अशी घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपस्थित नाईक बोलत होते. यावेळी उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, खासदार विशाल पाटील, ज्येष्ठ संचालक मोहनराव कदम, माजीमंत्री अजितराव घोरपडे, संग्रामसिंह देशमुख, राहुल महाडिक, महेंद्र लाड, प्रकाश जमदाडे, तानाजी पाटील, सुरेश पाटील, वैभव शिंदे, अमोल बाबर, बाळासाहेब होनमोरे, बी. एस. पाटील, मन्सूर खतीब, ॲड. चिमण डांगे, अनिता सगरे, मनोज शिंदे, रामचंद्र सरगर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ उपस्थित होते.
मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांची संख्या दोन लाख ९० हजार आहे. या सर्व शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेकडून अपघाती विमा उतरला आहे. यापूर्वी मुलीच्या लग्नासाठी ५० हजार रुपयांचे कर्ज जाहीर केले आहे. विकास सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी १० हजार रुपये विना परतावा मदत देणार आहे. त्यासाठी बँकेने दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बँकेला मिळालेला नफ्यावर आयकर भरण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सभासद शेअर्सची रक्कम सरकारने वाढवलीनाईक म्हणाले, सभासद शेअर्सची रक्कम ही सरकारने वाढवली आहे. याशिवाय या शेअर्स रकमेवर १२ टक्के लाभांश देण्यात येत आहे. सोसायटी ऑनलाइन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काही संस्थांमध्ये संगणक प्रिंटर उपलब्ध झाले नसले तरी त्यांना पुढील सहा महिन्यात उपलब्ध होईल.
पीक कर्ज मर्यादा वाढवाबहुतांशी सभासदांनी पीक कर्ज रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली. वांगी सोसायटीचे अध्यक्ष सुरेश मोहिते यांनी पीक कर्ज मर्यादा ५० हजार ऐवजी ६० हजार रुपये करण्यात यावी, अशी विनंती केली. काही सभासदांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज प्रकरण सोसायटीमार्फत देण्यात यावी, अशी मागणी यावेळी केली.
संगणक, प्रिंटर नादुरुस्तबाळासाहेब होनराव यांनी विकासासाठी त्यांना संगणक प्रिंटर दिले आहे. ते नादुरुस्त असून नवीन देण्यात यावे तसेच, सामान्यांना कर्ज मिळत नसल्याबद्दल तक्रार केली. काही सभासदांनी विकास सोसायटीची ८० टक्के पेक्षा कमी वसुली असल्याने शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. याबाबत बँकेने तोडगा काढण्याची मागणी केली. सुरेंद्र चौगुले यांनी ओटीएस योजना शेतकरी आणि बिगर शेती कर्जदारासाठी चांगली असून त्याची मदत ३१ मार्च २०२२ करण्यात यावी, अशी मागणी केली. प्रभाकर पाटील यांनी संस्था सभासद आणि वैयक्तिक सभासद कमी झाले आहेत, याकडे लक्ष वेधले.