सांगली : महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेने (मेस्टा) सांगली जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. शालेय शुल्कात सवलत देण्याविषयी राज्याच्या भूमिकेविरोधात जिल्हा संघटनेने भूमिका घेतल्याने ही कार्यवाही झाली.
मेस्टाचे जिल्हाध्यक्ष संजय तायडे-पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्हाध्यक्ष व सरचिटणीसांची संघटनेतून गच्छंती केल्याचेही त्यांनी जाहीर केले.
त्यांनी सांगितले की, सांगलीचे पदाधिकारी सहा वर्षांपासून या पदावर कार्यरत असून, संघटना वाढीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत. मनमानी करीत नवी कृती समिती स्थापन केली. संघटनेत फूट पाडून कार्यकर्त्यांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला. संघटनेच्या कोणत्याही आंदोलनात सांगलीचा सहभाग नव्हता. गेल्या आठवड्यात संघटनेने इंग्रजी शाळांची प्रतिमा उजळविण्यासाठी चांगले निर्णय घेतले, पण सांगली शाखेने स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध दर्शवीत आपली स्वतंत्र भूमिका जाहीर केली.
पाटील म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर शालेय शुल्कात सवलतीचा निर्णय मेस्टाने घेतला आहे. कोरोनामुळे पालकांच्या रोजगारावर गदा आली आहे, त्यामुळे फीमध्ये काही अंशी सवलतीची मागणी पालकांमधून व सामाजिक संघटनांकडून होत होती. याचा सकारात्मक विचार करून मेस्टाने गरजू पालकांना शुल्कामध्ये २५ टक्के सवलत जाहीर केली. कोरोनाने मयत झालेल्या पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाचा निर्णयही जाहीर केला; पण सांगलीतील शाळांनी याला विरोध दर्शविला. शालेय शुल्कात सवलत देण्याचा निर्णय कोणाच्याही दबावाखाली घेणार नाही, त्या-त्या शाळांनी स्वत:हून निर्णय घ्यावा असे जाहीर केले.
कोट
मेस्टा संघटनेशी सांगली जिल्ह्यातील एकही शाळा संलग्न नाही. त्यामुळे शालेय शुल्कात सवलतीच्या त्यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही. सवलतीचा निर्णय संबंधित शाळा स्वत: घेईल.
- बाहुबली कबाडगे, अध्यक्ष, इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (इस्टा), सांगली
सांगलीतील शाळा संघटनेत होत्या. मात्र, त्यांनी विरोधाची भूमिका घेतली. त्यामुळे सांगलीची शाखा व कार्यकारिणी बरखास्त केली आहे. काही मोठ्या शाळांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील अन्य सर्व शाळा मेस्टामध्ये आहेत. त्यांना सोबत घेऊन येत्या आठवड्यात सांगलीची नवी कार्यकारिणी जाहीर करणार आहोत.
संजयराव तायडे-पाटील, अध्यक्ष, मेस्टा