सांगली : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी कडकडीत व उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असून ठिकठिकाणी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी, निदर्शने, निषेध फेऱ्या काढून घटनेचा निषेध करण्यात आला.
सांगलीच्या स्टेशन चौकात पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सांगलीतील मारुती रोड, हरभट रोड, गणपती पेठ, स्टेशन रोड, स्टँड परिसर, मार्केट यार्ड अशा सर्व मुख्य बाजारपेठांमध्ये बंदमुळे शुकशुकाट होता.
अनेकठिकाणी घटनेच्या निषेधाचे फलकही लावण्यात आले होते. माधवनगर (ता. मिरज) येथे शनिवारी मूकपदयात्रा काढण्यात आली. येथील गांधी चौकात शोकसभेनंतर पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करण्यात आली. शिराळा, खानापूर, मिरज, वाळवा या तालुक्यांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला.