संतोष भिसे सांगली : जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी अक्षरश: हाहाकार उडाला आहे. बहुतांशी कोविड रुग्णालयांनी ऑक्सिजन नसल्याचे सांगत नव्या रुग्णांना दाखल करुन घेणे थांबविले आहे. रविवारी दुपारी सर्रास रुग्णालयात जेमतेम तीन ते चार तासांचा ऑक्सिजन शिल्लक होता.ऑक्सिजनसंदर्भात आणिबाणीच्या स्थितीमुळे डॉक्टरांचेही धाबे दणाणले आहे. विशेषत: व्हेन्टिलेटरवरील रुग्णांना जगवायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन रात्रं-दिवस प्रयत्न करत आहे, पण पुरवठाच नसल्याने प्रशासनही हवालदिल झाले आहे.
रुग्णालयांची दररोजची गरज सरासरी ४० टनांवर पोहोचलेली असताना पुरवठा मात्र २० टनांहून कमी होत आहे. कोरोना महामारीच्या गेल्या वर्षभराच्या कालावधीत प्रथमच इतकी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी सकाळपासून सांगली-मिरजेतील बहुतांश कोविड रुग्णालयांबाहेर ऑक्सिजन संपल्याचे फलक झळकले होते. रुग्णांच्या नातेवाईकांनी अन्य रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था पाहून रुग्णाला शिफ्ट करावे अशा सूचना फलकावर लिहिल्या होत्या.शनिवारपासूनच आणिबाणीची स्थितीलोकमत प्रतिनिधीने ऑक्सिजनची उपलब्धता तपासण्यासाठी रविवारी दुपारपासून सांगली-मिरजेतील सर्वच कोविड रुग्णालयांकडे आणि जिल्हाधिकार्यांनी नियुक्त केलेल्या प्रशासन अधिकार्यांकडे चौकशी केली, तेव्हा सर्वांनीच ऑक्सिजन शिल्लक नसल्याचे सांगितले. जेमतेम दोन तास पुरवठा होऊ शकेल असेही स्पष्ट केले. किंबहुना इतकी चिंताजनक स्थिती शुक्रवारपासूनच असल्याचेही स्पष्ट केले. यावरुन स्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.ऑक्सिजनअभावी मृत्यू ?शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचे मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. व्हेन्टिलेटरवर मृत्यूशी झगडणार्या कोरोना रुग्णांना प्राणवायूच मिळाला नाही. त्यांना वाचविण्यासाठी डॉक्टरांचे आटोकाट प्रयत्न ऑक्सिजनअभावी अयशस्वी ठरले. रुग्णाच्या मृत्यूमुळे संतापलेल्या नातेवाईकांच्या रोषाला डॉक्टरांना तोंड द्यावे लागले. असे प्रकार टाळण्यासाठी रुग्णालयांनी ऑक्सिजनची गरज असणारे नवे रुग्ण दाखल करुन घ्यायचे थांबविले आहे. तसेच फलकच लावले आहेत.ऑक्सिजन ऑडिटच्या फक्त घोषणाचऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याच्या घोषणा पालकमंत्री जयंत पाटील यांनी वारंवार केल्या आहेत. वापर काटेकोरपणे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, पण त्याबाबत फारशा हालचाली झाल्याचे दिसत नाही. कोरोनामध्ये समाजसेवा करण्याची संधी साधण्यासाठी गावोगावी तसेच सांगली-मिरजेत गल्लोगल्ली कोविड सेंटर्स निघाली. तेथे प्रत्येक बेडला ऑक्सिजन सिलिंडर लाऊन ठेवला आहे. त्याच्या वापरावर कोणाचेच नियंत्रण नसल्याची धक्कादायक माहिती काही डॉक्टरांनी दिली.पोलीस बंदोबस्तात टँकरऑक्सिजनच्या आणिबाणीच्या स्थितीमुळे टँकर्सना पोलीस बंदोबस्त द्यावा लागत आहे. रविवारी सकाळी ११ टन ऑक्सिजन घेऊन आलेला टँकर सांगली, इस्लामपूर व शिराळा येथे वाटप करत फिरला. त्यासोबत पोलीस बंदोबस्त होता. बेल्लारीहून येणार्या टँकर्सनादेखील कडक बंदोबस्त देण्यात आला आहे. ऑक्सिजन वाटपावरील नियंत्रणासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार प्लॅन्टमध्येच ठिय्या मारुन आहेत.कोल्हापुरची सीमाबंदी, सिव्हिल सलाईनवरकोल्हापूरमधील ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पांनी जणू सीमाबंदीच स्वीकारली आहे. तेथून सांगलीसाठी ऑक्सिजन पुरवठा थंडावला आहे. सांगली शासकीय रुग्णालयाला तेथून काही प्रमाणात पुरवठा होतो. तो कमी झाल्याने प्रशासन सलाईनवर आहे. रविवारी सकाळी २५ सिलिंडर उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला. अद्याप ५० सिलिंडरसाठी प्रतिक्षा आहे. मिरज कोविड रुग्णालयात एकूण १६ हजार लिटरच्या दोन टाक्या असल्या तरी साठा कमी झाला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळपर्यंत पुरवठा झाला नाही तर आणिबाणीची स्थिती निर्माण होईल.
जिल्ह्यात ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता आहे. रविवारी सकाळी एक टँकर आला असून बेल्लारीहून आणखी एक टँकर निघाला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी किंवा डॉक्टरांनी ऑक्सिजनसाठी समन्वयक अधिकार्यांशी संपर्क साधावा. ऑक्सिजन संपल्याविषयी कोणीतरी हेतुपुरस्पर माहिती पसरवत आहे.- डॉ. अभिजित चौधरी,जिल्हाधिकारी