सांगली : जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुगणना सुरू असली तरी, तिला म्हणावा तितका प्रतिसाद यंत्रणेकडून मिळालेला नाही. ३० एप्रिलअखेर जिल्ह्याची पशुगणना पूर्ण करण्याचे आदेश असून, सध्या जिल्ह्याची पशुगणना केवळ ६७ टक्के पूर्ण झाली आहे.तांत्रिक अडचणीमुळे मागील काही वर्षांपासून पशुगणना झालेली नाही. पशुसंवर्धन विभागाला केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना राबविण्यासाठी पशुगणनेवरच अवलंबून राहावे लागते. लसीकरण, दुष्काळी उपाययोजनांसाठी पशुगणना गरजेची असते. यापूर्वी २०१३ मध्ये पशुगणना झालेली होती. त्यामध्ये गाय आणि म्हैसवर्गीय जनावरांची संख्या सहा लाख ६७ हजार ६३५ होती. मोठी जनावरे एक लाख ६६ हजार ५४५, लहान जनावरे चार लाख ८२ हजार बावीस होती. याशिवाय तेरा लाख १६ हजार २०२ शेळ्या-मेंढ्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये पशुगणना करण्यात येणार होती, मात्र त्यावेळी टॅब उपलब्ध नसल्यामुळे ती प्रलंबित राहिली होती. त्यानंतर टॅब उपलब्ध होऊनदेखील पशुगणना झाली नव्हती. उशिरा टॅब मिळाल्याने गणनेचे काम करता आले नाही. टॅब कमी पडल्याने तसेच दुर्लक्ष झाल्याने पशुसंवर्धन आयुक्तांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात १५५ प्रगणक असून, त्यासाठी खासगी मनुष्यबळ आणि पशुपर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्याची ६७ टक्के पशुगणना पूर्ण झाली असून, ग्रामीण भागातील ७२ टक्के, तर महापालिका क्षेत्रात केवळ ४४ टक्केच पशुगणना झाली आहे. ग्रामीण भागातील काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील पशुगणना करण्यासाठी प्रगणकांची संख्या कमी असल्यामुळे वेळेत काम संपवण्याचे आव्हान आहे. महापालिका क्षेत्रातील अधिकाºयांनी काही प्रगणकांची नियुक्ती केली आहे; पण त्यातील काहीजण नागरिकांकडून माहिती व्यवस्थित भरुन घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. दोन दिवसांपूर्वी तर लहान मुलांकडूनच पशुगणना केली जात असल्याचा प्रकार पुढे आला होता. तक्रार करणाºया नागरिकांनाच अरेरावीची भाषा वापरली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.तांत्रिक अडचणीमुळे पशुगणनेला उशीर : संजय धाकटेजिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ७२ टक्के पशुगणनेचे काम पूर्ण झाले आहे. महापालिका क्षेत्रातील पशुगणना ४४ टक्के झाली आहे. या पशुगणनेला गती देण्यासाठी महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी या कामासाठी सॅनिटरी इन्स्पेक्टर यांची नियुक्ती केल्याचे सांगितले आहे. येत्या दि. ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्याची पशुगणना शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय धाकटे यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात केवळ ६७ टक्केच पशुगणना पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:11 PM