सांगली : अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर अमानुषपणे झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यात उद्या, गुरूवारी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आयोजित बैठकीत जिल्हाभरातून आलेल्या मराठा समाजबांधवांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. कडकडीत बंदबरोबरच लवकरच व्यापक स्वरूपात मोर्चा काढण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला.अंतरवाली सराटी येथील लाठीहल्ल्याच्या घटनेचा संपूर्ण राज्यातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातही अनेक तालुक्यात आणि गावातही आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचून त्यावर तातडीने तोडगा काढण्यात यावा यासाठी सांगलीतील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनमध्ये बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शासनाच्या धोरणाचा कडक शब्दात निषेध व्यक्त केला.बैठकीत सुरूवातीला मोर्चा की बंद यावरून जोरदार चर्चा झाली यानंतर अखेर सुरूवातीला घटनेचा निषेध म्हणून बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मराठा क्रांती मुक माेर्चाच्या धर्तीवर सांगलीत एक व्यापक मोर्चाही काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी गुरूवारी बंद झाल्यानंतर मोर्चाचे नियोजन करण्याचेही ठरविण्यात आले.यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, आ. विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, वैभव शिंदे, शहाजी पाटील, डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, विलास देसाई, प्रशांत भोसले, नितीन चौगुले, दिग्विजय पाटील, आशा पाटील, मानसी भोसले, प्रवीण पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, शैलेश पवार, अमृतराव सुर्यवंशी यांच्यासह जिल्हाभरातून आलेले मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालन्यातील घटनेचा निषेध: सांगली जिल्ह्यात येत्या गुरूवारी कडकडीत बंद
By शरद जाधव | Published: September 05, 2023 3:24 PM