सांगली : प्रमाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजाराचे प्रोत्साहन अनुदान गुरुवारी दि. २० ऑक्टोबर रोजी जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरण केलेल्या ६१ हजार २८१ शेतकऱ्यांची यामुळे दिवाळी गोड होणार आहे. ९८.५० टक्के लाभार्थ्यांनी प्रमाणीकरण केल्याने राज्यात सांगली जिल्हा अव्वल ठरला आहे.जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानासाठी ६२ हजार ४४२ पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील ५९ हजार १४३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांपैकी ६१ हजार २८१ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. १ हजार २६१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. तसेच ४५५ शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल आहेत. आधार लिंक न झालेले आणि तक्रारी असलेल्या शेतकऱ्यांबाबतचा निर्णय आज (गुरुवारी) जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत होईल.आधार प्रमाणीकरणवेळी ‘आधार क्रमांक अमान्य’ केलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी त्यांच्या आधार क्रमांकाची स्व-साक्षांकित प्रत तत्काळ त्यांच्या गावातील विविध कार्यकारी संस्थेचे सचिव किंवा संबंधित तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ६१ हजार २८१ जणांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. त्यांचे प्रमाण ९८.५० टक्के आहे.
जिल्हास्तरीय समितीची आज बैठक
अद्यापही १ हजार ३६१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. याशिवाय ४५५ शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. आधार प्रमाणीकरण न झालेले तसेच तक्रारीबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीमार्फत निकाली काढल्या जाणार आहेत.
दिवाळी गोड होणारतक्रार निकाली निघाल्याशिवाय प्रोत्साहन अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे १ हजार ३६१ शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाबाबतचा गुरुवारी निर्णय होईल. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.