सांगली : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मिरज, जत, तासगाव, पलूस, वाळवा, शिराळा तालुक्यांतही जोरदार सरी कोसळल्या. यापावसामुळे आज, शुक्रवारी सकाळी जत तालुक्यात वळसंग ते सोरडी रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
सांगलीत दुपारी चारनंतर ढगांची दाटी झाली. सायंकाळी सव्वापाचपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाच तासांहून अधिक काळ पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, चौक जलमय झाले. पाणी साचून राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे शुक्रवार, २० मे रोजीही जिल्ह्यात मोठ्या पावसाचा अंदाज आहे.
शिराळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वाळवा तालुक्यात सायंकाळी सहापासून पावसाची संततधार सुरू होती. दुष्काळी जत तालुक्यात दुपारी तासभर वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याचा पारा ३७ ते ३९ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. रात्रीचे तापमानही २४ ते २७ अंशाच्या घरात गेले होते. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने तापमानात घट नोंदली आहे. कमाल तापमान अचानक ३१ अंशापर्यंत, तर किमान तापमान २४ अंशापर्यंत खाली घसरले आहे. त्यामुळे उकाडा गायब झाल्याचा अनुभव सांगलीकरांनी घेतला.
सांगलीच्या या भागात पाणी साचून
शहरातील उत्तर शिवाजीनगर, शिवाजी मंडई, मारुती रोड, राजवाडा परिसर, स्टेशन चौक, स्टँड परिसर, सिव्हिल हॉस्पिटल चौक या ठिकाणी पाणी साचून राहिले होते. गुंठेवारी भागातही पावसामुळे मोठी दलदल निर्माण झाली आहे. ड्रेनेजसाठी खोदलेले रस्तेही चिखलात रुतले आहेत.
मिरजेत वाहनधारकांचे हाल
मिरज शहरात बसस्थानक परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. सांगली, मिरजेतील क्रीडांगणावरही पाणी साचले आहे.