सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६५.३८ टक्के, तर सांगली विधानसभा मतदारसंघात ६३.०२ टक्के मतदान झाले. मतदानात सुशिक्षित मतदारांपेक्षा दिव्यांग मतदारच भारी पडल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून दिसत आहे. जिल्ह्यातील ८१.१६ टक्के आणि सर्वाधिक नगरपालिका क्षेत्रातील ९२.४३ टक्के दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यावेळी प्रथमच दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी सर्व त्या सुविधा पुरवल्या होत्या. दिव्यांगांमध्ये अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग, कुष्ठरोगी, बहुअपंगत्व, मतिमंद, गतिमंद अशांचा समावेश होतो. त्यांना मतदानासाठी आवश्यक वाहने, आरोग्य सुविधा पुरवल्या होत्या. घरापासून मतदान केंद्रापर्यंत वाहन, व्हीलचेअर, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.प्रशासनाने दिव्यांग मतदारांना प्रोत्साहन दिल्यामुळेच मतदानाचा टक्का वाढला आहे. निकोप लोकशाही ठेवण्यासाठी मतदारांनी जागरुक राहून मतदानाचा हक्क बजावण्याची गरज आहे. प्रशासनाने मतदान जागृतीसाठी अनेक प्रयत्न करूनही सांगली शहरातील मतदानाचा टक्का फारसा वाढला नाही.
शहरी मतदार सुशिक्षित असूनही त्यांचा टक्का वाढला नसला तरी, सर्वाधिक दिव्यांग मतदारांनी मतदान करुन लोकशाही जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. जिल्ह्यात एकूण १७ हजार २२७ दिव्यांग मतदार असून, त्यापैकी १३ हजार ९८१ दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या मतदानाची सरासरी टक्केवारी ८१.१६ आहे.
कडेगाव, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात ८५ टक्क्याहून अधिक दिव्यांगांनी मतदान केले. जतमध्ये सर्वात कमी ६१.४६ टक्के दिव्यांगांनी मतदान केले. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील ८०.९७ टक्के व नगरपालिका क्षेत्रातील सर्वाधिक ९२.४३ टक्के दिव्यांग मतदारांनी मतदान केले.