ढालगाव : शिक्षक संघटना व लाेकसहभागातून शाळांची व शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रात सांगली जिल्हा आदर्श बनविण्याचे ध्येय आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे स्वराज कलेक्शनतर्फे शिक्षक दिनानिमित्त आयाेजित शिक्षक सत्कार समारंभात पाटील बोलत होते. ते म्हणाले जातपडताळणी किंवा काेणतीही अडचण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी येऊ नये. म्हणून शाळेत असतानाच संबंधित विद्यार्थ्यांना दाखले देण्याचा आमच्या सरकारचा मनोदय आहे. मागील दोन वर्षांत आपण वर्गाशिवाय शाळा चालवून दाखवल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज अनेक निकष बदलेले आहेत. गुणवत्ता वाढावी म्हणून जिल्ह्यात १४१ शाळा माॅडेल स्कूल म्हणून निवडल्या आहेत. या शाळांमध्ये मैदान, शौचालय, संरक्षित भिंत, हात धुण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहेत.
ढालगाव येथील एका माजी सैनिकाने शिक्षक बांधवांचा केलेला सन्मान तसेच स्वराज कलेक्शनसारखे अद्ययावत दालन उभे करून सेवा दिल्याबद्दल अजितराव खराडे यांचे पाटील यांनी कौतुक केले.
कार्यक्रमास ‘महांकाली’च्या अध्यक्षा अनिता सगरे, अविनाश पाटील, मारुती पवार, दत्तात्रय पाटील, सुरेश पाटील, बाबासाहेब मुळीक, संजय हजारे, जालिंदर देसाई, औदुंबर पाटील, राजाराम पाटील, बाळासाहेब पाटील, साधना कांबळे, सरपंच मनीषा देसाई, मधुकर देसाई, धनाजी देसाई, शंकर वगरे, माधवराव देसाई उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे नियोजन संजयकुमार झांबरे, बाळासाहेब पाटील, शशिकांत बजबळे, अजितराव पाटील, संजय वांगेकर, सदानंद सनगर आदींनी केले.