सांगली : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात ध्रुवताऱ्यासम अढळ स्थान पटकावलेला सांगली जिल्हा गुरुवारी (दि. २१) हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या साठ वर्षांत जिल्ह्याने अनेक क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करत विकासाच्या वाटेवर वाटचाल कायम ठेवली आहे.
तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातून २१ नोव्हेंबर १९५९ रोजी स्वतंत्र होऊन सांगली जिल्हा अस्तित्वात आला. तो मिरज, सांगली, बुधगाव, औंध, जत आणि इचलकरंजी संस्थानांत विभागला होता. वाळवा, शिराळा आणि तासगाव तालुके जुन्या सातारा जिल्ह्याचा भाग होते. १९४८ मध्ये मिरज, सांगली, बुधगाव, इचलकरंजी, जत, औंध संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. त्यानंतर विलीन संस्थानातील गावे व जुन्या तासगाव, शिराळा, तासगाव या तालुक्यांतील गावे मिळून दक्षिण सातारा जिल्हा झाला. तो तत्कालीन मुंबई इलाख्याचा भाग होता. आजच्या सातारा जिल्ह्याला त्यावेळी उत्तर सातारा असे नाव होते.
१ मे १९६० रोजी भाषावार प्रांतरचनेनंतर मुंबई इलाख्याचे मराठी भाषिक भागाचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्यानंतर स्वतंत्र सांगली जिल्ह्याच्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या. २१ नोव्हेंबर १९६० तो अस्तित्वात आला. खानापूर, वाळवा, तासगाव, जत आणि मिरज हे तालुके आणि आटपाडी, शिराळा, कवठेमहांकाळ हे तीन महाल मिळून जिल्ह्याची प्रशासकीय रचना झाली. वाळवा आणि मिरज असे दोन प्रांत (विभाग) तयार केले. १९६८ मध्ये आटपाडी, शिराळा आणि कवठेमहांकाळ महालांची पुनर्रचना होऊन ते तालुके बनले.राज्यासाठी योगदान
जिल्ह्याने गेल्या ५९ वर्षांच्या वाटचालीत सहकार, राजकारण, शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांत लधवेधी कामगिरी केली आहे. सांगलीच्या राजकीय नेतृत्वांनी राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यात मोठाच हातभार लावला. आजही राज्याच्या राजकारणाचे पान सांगलीशिवाय हलत नाही, असेच म्हणावे लागेल.