सांगली : राज्यभरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रसिध्दीसाठी आंदोलन करत असल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केले.
या वक्तव्याच्या निषेधार्थ किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषीमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. दरम्यान, परवानगी न घेता आंदोलन केल्याबद्दल आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली.विविध संघटनांच्या माध्यमातून सध्या देशभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी केवळ प्रसिध्दीसाठी हे आंदोलन करत असल्याचा आरोप केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केला होता. सिंह यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रविवारी किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषीमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले.किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, दिगंबर कांबळे, गौस शिरोळकर, सुधीर गावडे, सुदर्शन घेरडे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, परवानगी न घेता आंदोलन केल्याबद्दल विश्रामबाग पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांवर कारवाई केली.पाच कार्यकर्त्यांना अटककेंद्रीय कृषिमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी किसान सभेच्या पाच कार्यकर्त्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी दुपारी हे आंदोलन झाले.
अटक केलेल्यांमध्ये उमेश दिनकरराव देशमुख (वय ५०, अंजना अपार्टमेंट, सांगली), दिगंबर रामचंद्र कांबळे (३५, शिरढोण, ता. कवठेमहांकाळ), गौस शौकत शिरोळकर (३४, कवठेमहांकाळ), सुधीर राजाराम गावडे (३६, पोलीस वसाहत, विश्रामबाग), सुदर्शन मुरलीधर घेरडे (३३, लंगरपेठ, ता. कवठेमहांकाळ) यांचा समावेश आहे.
या सर्वांनी पोलीस व प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अचानक केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली.