सांगली :
शिक्षकाची व त्याच्या दोन सहकाऱ्यांची पदवीधर वेतनश्रेणी मान्यता करून देण्याच्या मोबदल्यात एक लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व अधीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. माध्यमिक शिक्षण अधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (वय ५८, रा. विश्रामबाग सांगली) व अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे ( वय ४१, रा. अहिल्यानगर कुपवाड) अशी दोघांची नावे आहेत शुक्रवारी रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
तक्रारदार व त्याच्या दोन शिक्षक मित्रांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यताबाबतचे काम माध्यमिक शिक्षण विभागाकडे होते. या कामासाठी शिक्षणाधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांच्या मित्रांकडे प्रत्येकी ६० हजार रुपयांची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदाराने २४ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता दोघांनी एक लाखांची ८० हजार रुपयांची मागणी करत चर्चेअंती एक लाख ७० हजार रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रात्री उशिरा आपला सापळा रचून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करत ती स्वीकारली. ती रक्कम शिक्षण अधिकारी कांबळे यांना दिल्यानंतर दोघांना कांबळे यांच्या राहते घरी पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुरू आहे.