सांगली : खून, खुनाचा प्रयत्न असे अर्धा डझनहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (वय ३७, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) यास पंढरपूर (जि. सोलापूर) येथे पकडण्यात गुंडाविरोधी पथकाला शुक्रवारी पहाटे यश आले. गेल्या आठ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत तो फरारी होता.विट्यातील गुंड संजय कांबळे याचा खून केल्यानंतर भावश्या चर्चेत आला. तत्पूर्वी त्याने पूर्ववैमनस्यातून रेठरेधरणमधील धनाजी मोहन पाटील यांचा खून केला होता. या दोन्ही खुनाच्या घटनेनंतर तो फरारी झाला होता. अनेक वर्षे त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता.
तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख बाळासाहेब वाघमोडे यांच्या पथकाने त्यास परराज्यात पकडले होते. त्याला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आठ वर्षापूर्वी खून खटल्याच्या सुनावणीला त्याला इस्लामपूर न्यायालयात नेण्यात येत होते. त्यावेळी त्याने पोलिसांना हिसडा मारुन न्यायालय इमारतीवरुन उडी घेऊन पलायन केले होते. तेंव्हापासून तो फरारीच राहिला.
फरारी काळात १ डिसेंबर २०१६ रोजी रेठरेधरणमध्ये येऊन संताजी खंडागळे-पाटील यांचा घरात घुसून खून केला होता. त्यांच्या पत्नीवर खुनी हल्ला केला होता. या घटनेनंतर हवेत गोळीबार करुन भावश्या, भावश्या, असे ओरडत तो पळून गेला होता.संताजी खंडागळे-पाटील यांचा फरारी काळात खून करुन भावश्याने पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले होते. या खूनप्रकरणी भावश्याच्या पुण्यातील दोन साथीदारांना अटक करण्यात यश आले होते. त्यांच्याकडूनही भावश्याचा ठावठिकाणा मिळाला नव्हता.
स्थानिक गुन्हे अन्वेषणची टिमही त्याच्या मागावर होती. पण त्यांना सुगावा लागत नव्हता. तो पंढरपूर येथे आश्रयाला असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती. पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डोके यांनी भावश्याला शिताफीने पकडले.गुन्ह्यांची मालिकाअत्यंत खूनशी आणि धिप्पाड यष्टी असलेल्या भावश्याने गेल्या दहा वर्षात वाळवा तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड दबदबा निर्माण केला होता. त्याला कोणतेही व्यसन नाही. मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह करतो. एकाठिकाणी जास्त दिवस राहणेही टाळतो. त्यामुळेच तो गेली आठ वर्षे पोलिसांना गुंगारा देत फरारी होण्यात यशस्वी झाला. तीन खून, खुनाचा प्रयत्न, पोलिसांच्या ताब्यातून पळण जाणे, सरकारी कामात अडथळा, बेकायदा शस्त्र बाळगणे, असे गुन्हे त्याच्याविरुद्ध नोंद आहेत.