Sangli Election Result: सांगलीत भाजपाचा जयजयकार; ६ जागांवरून गेले थेट चाळीशी पार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 04:51 PM2018-08-03T16:51:19+5:302018-08-03T16:59:03+5:30

Sangli Election Result : राजकीय तज्ज्ञांसह सर्वांचेच अंदाज धुळीस मिळवित सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली आहे. महापालिकेच्या ७८ पैकी ४१ जागा मिळवित भाजपने बहुमताचा आकडा पार केला

Sangli Election Result: Sangli BJP got huge victory, from 6 seat to cross 40 in Munciple Election | Sangli Election Result: सांगलीत भाजपाचा जयजयकार; ६ जागांवरून गेले थेट चाळीशी पार

Sangli Election Result: सांगलीत भाजपाचा जयजयकार; ६ जागांवरून गेले थेट चाळीशी पार

Next

सांगली : राजकीय तज्ज्ञांसह सर्वांचेच अंदाज धुळीस मिळवित सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली आहे. महापालिकेच्या ७८ पैकी ४१ जागा मिळवित भाजपने बहुमताचा आकडा पार केला. दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला धक्कादायकरित्या पराभवाचा सामना करावा लागला. या आश्चर्यकारक निकालानंतर तिन्ही शहरांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे महापालिकेची ही निवडणूक संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. विश्वजित कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई मदन पाटील यांनी आघाडीच्या बाजुने, तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आ.सुधीर गाडगीळ, आ.सुरेश खाडे यांनी भाजपकडून आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळेच, अनेकांचे अंदाज चुकीचे ठरवित भाजपने या सांगली निवडणुकीत धक्कादायक निकालांची नोंद करत सत्ता काबीज केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भाजपला पिछाडीवर टाकून सत्तेच्या दिशेने कुच करणाऱ्या राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला नंतरच्या टप्प्यात भाजपने चारीमुंड्या चित केले. एकूण ७८ जागांपैकी भाजपला ४१, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला ३५, स्वाभिमानी आघाडीला १, तर अपक्ष १ अशा जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे सत्तेसाठी ३९ जागांची मॅजिक फिगर ओलांडून भाजप पुढे गेले आहे. निकालानंतर सांगलीत पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत विजयोत्सव साजरा करण्यात आला. कोणत्याही प्रकारची टीका टाळून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि लोकांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला निवडून दिले, असे मत सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

६ वरून ४१ जागांवर!
महापालिकेच्या गतवेळच्या निवडणुकीत तत्कालीन स्वाभिमानी आघाडीतील भाजपकडे केवळ ६ जागाच होत्या. एकामागोमाग एक जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या संस्था ताब्यात घेणाऱ्या भाजपने महापालिकेचा गड जिंकताना सहा जागांवरून थेट ४१ जागांपर्यंत मजल मारली आहे.

Web Title: Sangli Election Result: Sangli BJP got huge victory, from 6 seat to cross 40 in Munciple Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.