सांगली : विकासाच्या नावावर जे काही प्रकल्प आता येत आहे, त्यातून विकास होतोय की पर्यावरणाची हानी याचा शांतपणे विचार करायला हवा. विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश योग्य नाही, असे स्पष्ट मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात ह्यजलसंवर्धनह्ण या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य भास्कर ताम्हणकर, किशोर पंडित, विलास चौथाई उपस्थित होते.राणा म्हणाले की, पर्यावरणावर आपले जीवन अवलंबून आहे. त्यामुळे याचे भान प्रत्येकाने प्रत्येक कृती करताना ठेवले पाहिजे. पर्यावरणास हानी न पोहचविता विधायक उपक्रम राबविले पाहिजेत. जागतिक तापमानवाढ हा विषय गंभीर बनला आहे. ग्लोबन वॉर्मिंगचा आलेख वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी व तिच्या योग्य देखभालीसाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. सर्व काही सरकार करेल, अशी मानसिकता बदलायला हवी. लोकांचीही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. समाजात सकारात्मक बदल व्हावा, असे वाटत असेल तर प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी.राजस्थान येथे जनसहभागाच्या मदतीने आम्ही हजारो जोहड म्हणजेच कच्चे तलाव निर्माण केले आहेत. तलावांमध्ये पावसाच्या पाण्याचे संकलन झाले. परिणामी परिसरातील दिड लाखाहून अधिक विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. देशाची व जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आपल्या देशात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत जाणार आहे. त्यामुळे पाण्याविषयी अधिक काळजी घ्यावी लागेल. पाणी वाचविणे व स्त्रोत निर्माण करणे यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. दैनंदिन जीवनातही आपण पाण्याचा गैरवापर करण्यात आघाडीवर आहोत. कोणत्याही परस्थितीत या गोष्टी रोखायला हव्यात. पाणी नियोजनाचे महत्व प्रत्येकाने समजून त्यानुसारच वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.मुलभूत प्रश्नांपेक्षा धर्म-जातीत अडकलो!मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी आपण धर्म आणि जातीच्या राजकारणात गुंतून पडत आहोत. समाजात विभागणी होत आहे. समाजातील एकता महत्त्वाची आहे. समाज एकवटून अनेक चांगली व पर्यावरणासाठी पोषक कामे करता येतात. लोकसहभागातून राजस्थानातील बारा मृत नदींना आम्ही जीवंत केले आहे. आज त्याचा लाभ ग्रामस्थांनाच होत आहे. यावरूनच लोकसहभाग व लोकांमधील एकता किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट होते, असे राणा म्हणाले.देश पाणीदार बनविण्यासाठी एकत्र या!राणा म्हणाले की, लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या प्रमाणात पाणीसाठे वाढत नाहीत. लोकांमध्ये अजूनही आम्हाला काय त्याचे असा विचार करण्याची वृत्ती कायम आहे. असा विचार घातक आहे. भविष्यात पाणीसंकट टाळायचे असेल तर सर्वांनीच पुढाकार घेऊन देश पाणीदार बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.