सांगली : रिक्षापरवाने, बॅचबिल्ला व चालक परवान्यासाठी बनावट शाळा सोडल्याचा दाखला तसेच गुणपत्रके दिल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित किरण होवाळे याच्या पोलीस कोठडीत सात दिवसांनी वाढ करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.अटक केलेल्यांत सदाशिव भगवान देवकुळे (वय ४५, रा. वरचे गल्ली, साठेनगर, तासगाव), नंदकुमार रामचंद्र कुंभार (४०, रा. प्रकाशनगर, कुपवाड) या दोघांचा समावेश आहे. यापूर्वी पोलिसांनी मुख्य सूत्रधार होवाळे याच्यासह अशोक इंगळे, बशीर मुल्ला, हणमंत गोल्लार यांना अटक केली होती.
बुधवारी सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. सूत्रधार होवाळे याच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली, तर अन्य संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.ड्रायव्हिंग लायसन्ससाठी चिंचणी येथील डी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच तासगावमधील यशवंत हायस्कूलचे आठवी तसेच नववी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रके तसेच शाळा सोडल्याचे बनावट दाखले होवाळे याने दिले होते. त्याच्याकडून दाखला घेऊन ड्रायव्हिंग लायसन्स काढल्याप्रकरणी अन्य पाच संशयितांना अटक करण्यात आली होती. त्याने आतापर्यंत दोनशेजणांना दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन बनावट दाखले त्याच्या सहीने विकल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे करत आहेत. याप्रकरणी आणखी काहींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लेखी पत्र देऊन आरटीओ कार्यालयाकडून होवाळे याच्या दाखल्यावर दिलेल्या परवान्याची माहिती मागविली आहे. पण आरटीओ कार्यालयाकडून माहिती न आल्याने पुन्हा स्मरणपत्र पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले.पुणे, कोल्हापूर, सातारा आरटीओंना पत्रहोवाळेकडून बनावट दाखले, प्रमाणपत्र घेऊन पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातही काहींनी ड्रायव्हिंग लायसन्स काढल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या तीन जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयांना माहिती देण्याबाबत पत्र दिले आहे.