मिरज : आद्य तंतुवाद्य निर्माते फरीदसाहेब सतारमेकर यांच्या सहाव्या आणि सातव्या पिढीतील वंशजांनी सतार निर्मितीच्या परंपरेला सतारवादनाची जोड देत, बालगंधर्व नाट्यमंदिरात रसिकांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या सतारीवरील राष्ट्रगीताने तर प्रत्येकाला भारावून टाकले.ज्युबिली कन्या शाळेतील एमईएस इंग्लिश शाळेचे स्नेहसंमेलन बालगंधर्व नाट्यगृहात पार पडले. पारंपरिक स्नेहसंमेलनाला संगीत मैफलीची जोड देत या शाळेने मिरजेतील संगीत परंपरेप्रती आदर व्यक्त केला. दीडशे वर्षांपूर्वी फरीदसाहेब सतारमेकर यांनी सतार निर्मितीचे बीज मिरज शहरात रोवले.
फरीदसाहेब आणि त्यांच्या वंशजांची सतार निर्मितीची कला सातासमुद्रापार पोहोचली आहे. मुज्जमिल अल्ताफ सतारमेकर आणि आरबाज मैनुद्दीन सतारमेकर हे याच घराण्यातले सहाव्या आणि सातव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात.मुज्जमिल याने सतारीवर सादर केलेल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी अवघे सभागृह उठून उभे राहिले. फरीदसाहेबांच्या सातव्या पिढीतील वंशज अरबाज मैनुद्दीन सतारमेकर आणि मुज्जमिल सतारमेकर या जोडगोळीने सतारीवर यमन राग सादर केला. यमन रागातील द्रुतलयीत त्यांनी वादन केले. त्यांच्या बहारदार वादनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
फरीदसाहेबांच्या सहाव्या आणि सातव्या पिढीतील हे चिमुकले कलाकार नात्याने काका-पुतणे लागतात. या कलाकारांनी बहारदार सतारवादन करीत पूर्वजांना अनोखी मानवंदनाच दिली. संमेलनाचे उद्घाटन प्रदीप शिरगुरकर, प्रशालीताई देशपांडे, संजय धामणगावकर, काका चौथाई, चंद्रकांत देशपांडे यांच्याहस्ते झाले.यावेळी मनीषा नाईक, शगुफ्ता लाटकर, मोहिनी कांबळे, मेघा जाधव, अर्चना कुलकर्णी, वंदना पवार, शुभांगी कांबळे, नीता पाटील, शिवराज खांडेकर, संतोष रजपूत, महेश पवार आदी उपस्थित होते.