सांगली : सैन्य दलात नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून इटकरे (ता. वाळवा) येथील अनिल कुंभार (वय २५) या तरुणाने सांगलीत स्टेशन चौकात दूरसंचार कार्यालयाच्या आवारातील सहाशे फूट टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी देत पुन्हा ‘वीरूगिरी’ केली.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता हा प्रकार घडला. पंधरा दिवसापूर्वीही तो याच टॉवरवर चढला होता. त्याच्या सुटकेसाठी पोलीस व महापालिकेच्या अग्निशमन दलाने धडपडक केली. तासभराच्या थरारानंतर त्याला सुरक्षित खाली घेण्यात यश आले.
सकाळी दहा वाजता त्याने सर्वांची नजर चुकवून टॉवरवर चढण्यास सुरुवात केली. तब्बल सहाशे फूट उंचीच्या टॉवरवर जाऊन तो उभा राहिला. पण कोणाचीही त्याच्यावर नजर गेली नाही. सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने टॉवरचे स्पेअरपार्ट व नटबोल्ट व लोखंडी अँगल खाली टाकले. तरीही कोणाचे लक्ष गेले नाही. अकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला.
अग्निशमन व पोलिसांनी त्याच्याशी मोबाईलवरच संपर्क साधून खाली उतरण्याची विनंती केली; पण त्याने मला नोकरीचे पत्र मिळाल्याशिवाय खाली उतरणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्याची समजूत काढताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. शेवटी पोलीस व अग्निशमनचे अधिकारी टॉवरवर चढले. समजूत काढून त्याला सुरक्षितपणे खाली घेतले. तासभर हा थरार सुरु होता.