ऑनलाइन लोकमत सांगली, दि. 23 - गेल्या काही वर्षांपासून शासकीय रुग्णालयातील तसेच खासगी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) गुरुवारी पुकारलेल्या खासगी डॉक्टरांच्या संपात जिल्ह्यातील दीड हजार डॉक्टर सहभागी झाले. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला. डॉक्टरांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था व सर्व सोयी पुरवाव्यात, अशी मागणी आयएमएतर्फे करण्यात आली.गेल्या आठवड्यात धुळे येथील डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात डॉक्टरच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर राज्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. राज्यातील निवासी डॉक्टरांनी सुरक्षेसाठी संप पुकारला. तीन-चार दिवस संप सुरु राहिल्याने रुग्णांचे हाल झाले. आयएमएतर्फे गुरुवारी याच मुद्द्यावर एक दिवसाची संपाची हाक देण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांना सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. अनिल मडके यांनी केले होते. त्यानुसार सांगली, मिरज, कुपवाड शहरासह जिल्ह्यातील लहान-मोठ्या खासगी रुग्णालयातील डॉक्टर संपात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा म्हणून दाखल झालेल्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात आले. बाह्यरुग्ण विभाग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. केवळ दाखल रुग्णांवर उपचार करण्यात आले.वाळवा, मिरज, शिराळा, कवठेमहांकाळ, खानापूर, जत, आटपाडी, पलूस, कडेगाव, तासगाव या तालुक्यातील खासगी डॉक्टर संपात सहभागी झाले होते. रुग्णालयात तसेच रुग्णालबाहेर आज बंद आहे असे फलक लावण्यात आले होते. सर्व रुग्णालये उघडी ठेवण्यात आली होती. डॉक्टरही रुग्णालयात बसून होते, पण त्यांनी बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवला नाही. अत्यावश्यक सेवेतील रुग्णांवर उपचार होणे गरजेचे असल्याने डॉक्टर व त्यांचे पथक रुग्णालयात कार्यरत होते. औषध दुकाने सुरू होती.खासगी डॉक्टरांच्या संपाचा रुग्णांना फटका बसू नये, यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना २४ तास ड्युटीवर राहण्याचे आदेश दिले होते. औषधांचा व इंजेक्शनचा तुटवडा पडू नये, यासाठी काळजी घेण्यात आली होती. सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर ड्युटीवर होते.संपातील सहभागी डॉक्टरसांगली : ३२०कुपवाड : ८०मिरज : ४०२जिल्ह्यात : ८००
सांगलीत दीड हजार खासगी डॉक्टर संपावर
By admin | Published: March 23, 2017 7:15 PM