सांगली : तासगाव येथे नगरपालिका पोटनिवडणूक प्रचाराच्या वादातून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकासह तिघे जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पांडूरंग चौधरी (वय ३५), हवालदार राजेंद्र मुरगाप्पा माळी (३२) व अनिल मोहिते (४२) अशी जखमी पोलिसांच्या नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेनंतर तासगाव शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मंगळवारी सकाळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कुणाचीही गय करु नका, कायदा हातात घेणाºयांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.तासगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामध्ये पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रसेने स्वतंत्रपणे उमेदवार उभा केले आहेत. सध्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे.
प्रचारावेळी भाजपचे खा. संजयकाका पाटील व राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नगरसेवकास मारहाण केली. त्यामुळे वातावरण तंग बनत गेले. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. त्यावेळी पोलिसांवरही दगडफेक झाली.