सांगली, दि. 20 :: भरधाव वेगाने मोटारीने धडक दिल्याने दोन चारचाकी व दोन दुचाकी वाहनांच चक्काचूर झाला. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास धामणी रस्त्यावरील आशिर्वाद धाब्याजवळ घडली. या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी नरेन उत्तम शिंदे (रा. बुधगाव) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी झालेल्यामध्ये अजय मोहन शिंदे (वय ३५, रा. सह्याद्रीनगर, सांगली), गणेश विजय चव्हाण (वय ३३, रा. विनायकनगर, हरिपूर), विनोद लक्ष्मण माने (४५, रा. बुधगाव), जावेद भालेचंद समलेवाले (४०, रा. बुधगाव), संतोष मोहन खोबरे (४१, रा. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रमोद अशोक सुतार (४३, रा. शिवकॉम्पलेक्स, गुलमोहर कॉलनी, सांगली) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित नरेन शिंदे हा कोल्हापूर रस्त्यावरून धामणीकडे मोटारीने (एमएच१३, एसी ५९६६)ने भरधाव वेगाने निघाला होता. आशिर्वाद धाब्याजवळ फिर्याद प्रमोद सुतार हे मित्रासमवेत जेवणासाठी आले होते. त्यांनी आपली चारचाकी वाहन (एमएच १०, बीए ४५९३) रस्त्याकडे पार्क केले होते. त्यांच्या वाहनामागे थोड्या अंतरावर अजय शिंदे याची मोटार (एमएच १०, बीए २५४७) होती.
संशयित शिंदे याच्या मोटारीने सुरूवातीला सुतार यांच्या चारचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे सुतार यांची मोटार पाचफुट फरफटत जाऊन धाब्याजवळ पार्क केलेल्या दोन दुचाकीवर आदळली. त्यापैकी एक स्कुटी सुतार यांच्या मोटारीखालीच अडकून तिचा चक्काचूर झाला. सुतार यांच्या मोटारीला धडक दिल्यानंतर शिंदे याचे वाहन अजय शिंदे यांच्या वाहनाला ठोकरून जवळ असलेल्या म्हसोबा मंदिरावर जाऊन उलटली.
यावेळी अजय शिंदे व गणेश चव्हाण हे त्यांच्या मोटारीजवळच थांबले होते. समोरील वाहनाचा ठोकरून शिंदे याची मोटार त्याच्या दिशेने आल्याने दोघांची पळापळ झाली. या ते दोघेजण जखमी झाले. उर्वरित तिघे जखमी नरेन शिंदे याच्या मोटारीतील असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
या विचित्र अपघातात तीनही मोटारीसह दोन दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नरेन शिंदे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक केलेली नाही.
एअरबॅगमुळे जिवीतहानी टळली
नरेश शिंदे याची मोटार भरधाव वेगाने होती. दोन मोटारीला धडकून त्याची मोटार मंदिरावर उलटली. त्याच्या मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. अपघातस्थळापासून दूरवर मोटारीचे पार्ट पडले होते. शिंदे याच्या मोटारीतील एअरबॅग वेळेवर उघडल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तसेच इतर दोन मोटारीत कोणी नसल्याने मोठा प्रसंग टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.