सांगली : पूर्ववैमनस्यातून कापुसखेड (ता. वाळवा) येथे सागर शिवाजी मरळे (वय ३०) या तरुणाचा कुऱ्हाडीने हल्ला करुन व दगडाने डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आला. शुक्रवारी सकाळी कापुसखेडमध्ये दत्तनगरमध्ये ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पाच संशयितांविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दिलीप भीमराव मोकाशी, त्यांची पत्नी, मुलगा नितीन, अतूल, सून व एक अनोळखी अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. अजून कोणाला अटक करण्यात आलेली नाही. सागर मरळे व संशयित दिलीप मोकाशी यांचे शेत लागूनच आहे. शेतातील विहिरील पाणी घेण्यावरुन त्यांच्या गेल्या अनेक महिन्यापासून वाद आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीवेळीही त्यांच्यात वाद झाले होते. त्यांच्यातील हा संघर्ष वाढत गेला. गुरुवारी रात्री सागर मरळे हा मित्राच्या शेतात ऊसाचा पाला पेटविण्यासाठी निघाला होता. त्यावेळी संशयितांनी त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यानंतर दगडाने डोकेही ठेचले. यामध्ये सागर जागीच मरण पावला.
दरम्यान संशयित नितीन मोकाशी यानेही आपल्यावर तलवारहल्ला झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार मृत सागर मरळे, त्याचे वडील शिवाजी मरळे, अशोक कोळी व अमोल कोळी यांच्याविरुद्ख खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.