ऑनलाइन लोकमत
सांगली, दि.5 - येथील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे गोवर्धन चौकात अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (वय २२) या तरुणावर भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी पंढरपूर (जि. सोलापूर) येथील नगरसेवक संदीप पवार यांच्यासह सहाजणांविरुद्ध पोलिसांचा संशय बळावला आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती.
नगरसेवक संदीप पवार, अर्जुन पवार, सचिन चौगुले, भैय्या पवार, नागेश धोत्रे व रामा पवार (सर्व रा. पंढरपूर) या सहाजणांची नावे चौकशीतून पुढे आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. बबलू सुरवसे हा मूळचा पंढरपूरचा आहे. दोन वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये नीलेश माने या तरुणाचा खून झाला होता. या खूनप्रकरणी बबलूला अटक झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या आई, वडिलांनी त्यास सांगलीत मामाकडे रहायला पाठविले होते. तेव्हापासून बबलू सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे मामाकडे राहतो. त्याच्या मामांचा बांबू विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी दुपारी मामाच्या दुकानातून शहरात कामानिमित्त दुचाकीवरुन येताना सहाजणांच्या टोळीने त्याच्यावर गोळीबार केला होता. नेम चुकल्याने बबलू बचावला होता. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने भेट देऊन संशयितांच्या शोधासाठी नाकाबंदी केली होती. रात्री उशिरापर्यंत बबलूकडे चौकशी केली जात होती. त्यानंतर त्याची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
पंढरपूरमध्ये खून झालेला नीलेश माने हा नगरसेवक संदीप पवार यांचा कार्यकर्ता होता. दोन वर्षापूर्र्वी भरदिवसा त्याचा धारदार शस्त्रांनी हल्ला करुन निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात बबलूसह सहा ते सात संशयितांना अटक करण्यात आली होती. बबलूला अटक झाल्यानंतर त्याच्या आई, वडिलांनाही मारहाण झाली होती. तेव्हापासून बबलूचे कुटुंब घाबरुन होते. त्यामुळे बबलू जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याला सांगलीत मामाकडे रहायला पाठविले होते. नीलेश माने याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नगरसेवक संदीप पवार व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती बबलूच्या चौकशीतून पुढे आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यादृष्टीने चौकशी करण्यासाठी शहर पोलिसांचे पथक येत्या एक-दोन दिवसात तपासासाठी पंढरपूरला रवाना होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी पंढरपूर पोलिसांशी संपर्क साधून बबलूविरुद्ध दाखल असलेला गुन्हा, नीलेश मानेचा खून कशातून झाला होता? नगरसेवक संदीप पवार यांची पार्श्वभूमी याची माहिती घेतली आहे.
पवारविरुद्ध गुन्हेसंदीप पवार हे अपक्ष नगरसेवक आहेत. त्यांच्या आई माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका आहेत. पवार यांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्याविरुद्ध मारामारी, जागा खाली करण्यासाठी धमकावणे, असे पंढरपूर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. बबलू सुरवसेविरुद्ध खून व मारामारी असे दोन गुन्हे नोंद आहेत.रिव्हॉल्व्हर कोणाचे?सहाजणांनी पाठलाग केला, कर्नाळ रस्त्यावरील गोवर्धन चौकात अडविले, त्यातील एकाने सिल्व्हर रंगाचे रिव्हॉल्व्हर काढून माझ्यावर गोळीबार केला. प्रसंगावधान ओळखून बाजूला सरकल्याने मी बचावलो, असे बबलू सुरवसे याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे हे रिव्हॉल्व्हर कोणाचे, याचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.