दिलीप मोहिते विटा : सांगली जिल्ह्यातील भाळवणी (ता. खानापूर) येथील डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने विटा शहरापासून दोन कि.मी. अंतरावर भारतातील पहिला अत्याधुनिक व सर्वसोयीनियुक्त असा राष्ट्रकुल कुस्ती आखाडा उभा राहत आहे. सुमारे ११ कोटी रूपये खर्चाच्या या कुस्ती संकुलात पाचशे मल्लांना लाल माती व मॅटवरील कुस्तीचे धडे दिले जाणार आहेत.भाळवणी येथील डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांना, ग्रामीण भागातील मुलांना कोल्हापूर, पुणेसारख्या ठिकाणी कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात येत नाही, त्यामुळे या भागात कुस्ती संकुलाची उभारणी करण्याची संकल्पना सुचली.
ही संकल्पना त्यांचे वडील सुभाष (भाऊ) पाटील यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ विटा नगरपरिषद हद्दीतील स्वमालकीची तीन एकर जागा या राष्ट्रकुल कुस्ती संकुलासाठी दिली. या तीन एकर विस्तीर्ण जागेत भारतातील हे पहिले कुस्ती संकुल उभे राहत असून त्याच्या प्रत्यक्ष कामालाही येत्या चार दिवसात सुरूवात होत आहे.या आखाड्यात एकाचवेळी ५०० मुलांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी चार कुस्ती प्रशिक्षक नियुक्त केले आहेत. मुलांच्या राहण्याची सोय आहे. मात्र, मुलांनी स्वत: जेवण तयार करण्याचे आहे. त्यांना दररोज लागणारा भाजीपाला उत्पादन करण्यासाठी आणखी तीन एकर जमिनीची व्यवस्था करण्यात आली आहे.या संकुलात जलतरण तलाव, सिन्थेटिक्स (रबरी) धावपट्टी, दुधासाठी १०० म्हैशींचा गोठा, लाल मातीचा आखाडा, दोन मॅट आखाडे, प्रशिक्षणार्थी मुलांसाठी पाच शालेय स्कूल बसेस यासह अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत.