सांगली : विश्रामबाग येथील दिलीप वसंतराव केडगे यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी अकरा तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे पैजण व मेखला असा पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केला. बुधवारी सायंकाळी सहा ते पावणेसात या पाऊणतासात चोरट्यांनी ही धाडसी चोरी करुन पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.
दिलीप केडगे महाशिव अपार्टमेंटमध्ये कुटूंबियासह राहतात. बुधवारी सायंकाळी हे कुटूंब कामानिमित्त बाहेर गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरुमधील कपाटातील साहित्य विस्कटले. लॉकरमधील सोन्याचे पाच तोळ्याचे तोडे, सहा तोळ्याच्या बांगड्या, चांदीचे पैजण व मेखला असा ऐवज लंपास केला. पावणेसात वाजता केडगे कुटूंब घरी परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले होते. श्वान अपार्टमेंट परिसरातच घुटमळले. रात्री उशिरा केडगे यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.अपार्टमेंटमध्ये चौकशीअवघ्या पाऊनतासात चोरी झाल्याने पोलिसांनी अपार्टमेंटमधील रहिवाशांकडे चौकशी केली. अपार्टमेंटमध्ये कोणी अनोळखी व्यक्ती आली होती, याबद्दल विचारणा करण्यात आली. पण काहीच माहिती मिळाली नाही. चोरटा परिसरात असून, त्याने पाळत घेऊन चोरी केली असण्याची शक्यता आहे.