मुंबई - राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे शेकडो नागरिकांनी आपला जीव गमावला. हजारो जनावरे दगावली आहेत. आत्तापर्यंत या पूरग्रस्त भागातून जवळपास 1.5 लाख नागरिकांचे स्थलांतरही करण्यात आलं. आता, पूर ओसरल्यानंतर या भागांना भेटी देण्याचं काम नेतेमंडळी आणि राज्यकर्त्यांकडून सुरू आहे. एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे महापूरानं घातलेल्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्तांना आता सरकारच्या मदतीची आस लागली आहे. त्यात, विरोधी पक्षनेते देवेंद्र यांनी त्यांच्या ट्विटरवरुन शेअर केलेला चिमुकल्याचा फोटो काळजाला भिडतोही अन् मास्क न वापरणाऱ्यांना बरंच काही शिकवतोही.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर ओसरल्यानंतर नागरिकांचा आक्रोश, डोळ्यातलं पाणी, पुन्हा घरटी बांधण्यासाठी चाललेली धडपड पाहून महाराष्ट्राला दु:ख अनावर झालं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांचे सांत्वन केले, तुम्ही सर्व ठीक आहात ना, हे महत्त्वाचं. हे मोडलेलं पुन्हा उभारू, याच बघू... असे म्हणत कुटुंब प्रमुखाप्रमाणे धीर दिला. मात्र, अद्यापही बेघर झालेल्या नागरिकांना घराची चिंता आहे. आजची भूक अन् उद्याचं काम... याचा मोठा प्रश्न या पूरग्रस्तांपुढे आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काल साताऱ्यातील एका गावात पूरग्रस्तांच्या घरी जावून जेवण केलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर, आज सांगलीतील वाळवा येथे जाऊन पाहणी केली. घरांची झालेली पडझड, शेतीचं झालेलं नुकसान, वाहून गेलेली पिकं हे चित्र पोटात कालवणारं आहे. फडणवीस यांनी ट्विटरवरुन हे विदारक चित्र दाखवलं आहे. या फोटोतील एक चित्र काळजाचं पाणी पाणी करतं. आपल्या पडलेल्या घरातून बाहेर डोकावणाऱ्या चिमुकल्याची नजर मनाला हळवं करते. मात्र, या परिस्थितीही त्याच्या तोंडावर असलेला मास्कही आपलं लक्ष वेधून घेतो.
एकीकडे वारंवार सांगूनही लोकं तोंडावर मास्क घालत नाहीत, कोरोनाचं गांभीर्य ओळखत नाहीत. पण, या चिमुकल्याचा फोटो बरंच काही सांगून जातो. कोरोनाची दाहकता पूराच्या भीषणतेतही अबाधित असल्याची जाणीवच हा चिमुकला करुन देतोय. पडलेलं घरं पुन्हा बांधायचंय, या आशेनेच हा चिमुकला भेट देणाऱ्या नेत्यांकडे मोठया अपेक्षेने पाहात असल्याचंही दिसत आहे.