सांगली: पावसाने राज्यभर थैमान घातले. पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या तर काही ठिकाणी महापूराची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, सांगलीत या पूराच्या पाण्यातून अनेक ठिकाणी मगरी आलेल्या पाहायला मिळल्या. या मगरींमुळे नागरिकांमध्ये मोठी धडकी भरली आहे. आता हा महापूर ओसरत आहे. पण, अनेक ठिकाणी मगरी, साप दिसत आहेत. अशीच एक घटना पूरबाधित सांगलीवाडी परिसरात घडली.
सांगलीवाडीमधील धरण रोडवर बुधवारी सकाळी मगर फिरत असल्याचं काही नागरिकांनी पाहिलं. ही मगर नागरी वस्तीत येत होती, पण काही तरुणांनी या मगरीला हुसकावून लावलं. त्यानंतर ही मगर लिंगायत स्मशानभूमीतील झाडांमध्ये लपून बसली. याची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली. वन कर्मचाऱ्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने मगरीला पकडलं.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसर, या मगरीची लांबी तब्बल 12 फूट असून, ही एक पूर्ण वाढ झालेली मगर आहे. मगरीला पकडल्यानंतर वनविभागाने त्या मगरीला नंतर नैसर्गिक अधिवसात पाठवले आहे. दरम्यान, नागरी वस्तीमध्ये एवठी मोठी मगर आढळल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.