सांगली : सांगली वन विभागाला ट्रॅंक्विलायजर गन अखेर मिळाली आहे. यासाठी नियोजन समितीकडून सहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. गन मिळाल्याने वन्यप्राण्यांच्या बचाव मोहिमेला मदत होणार आहे.
प्राण्यांच्या बचाव मोहिमेत त्यांना भूल देण्यासाठी ट्रॅंक्विलायजर गनची आवश्यकता भासते. सांगली वन विभागाकडे ती उपलब्ध नव्हती. गरज भासेल, तेव्हा कोल्हापूर, सातारा किंवा पुणे वन विभागाकडून ती मागविली जायची. सांगली शहरात गेल्या काही वर्षांत बिबट्या, गवे आदी वन्यप्राण्यांनी शिरकाव केल्याच्या घटना अनेकदा घडल्या. त्यांना शहराबाहेर काढण्याच्या मोहिमेत गनची गरज भासली होती. सांगलीत काही महिन्यांपूर्वीच बाजार समितीतून गव्याची सुटका करण्यात आली, तेव्हाही कोल्हापुरातून गन मागवावी लागली होती.
ग्रामीण भागात विहिरीत अडकलेल्या किंवा निवासी वस्त्यांमध्ये घुसलेल्या वन्यप्राण्यांना बाहेर काढतेवेळी गनची गरज भासायची. जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडू लागल्याने गनचा प्रस्ताव वन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्याला मंजुरी मिळून नियोजन समितीतून निधी उपलब्ध झाला. प्रत्यक्षात गन गुरुवारी ताब्यात मिळाली. वन विभागाचे अधिकारी अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली गनची प्राथमिक चाचणी झाली. त्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना महिनाभरात गनचे प्रशिक्षण देणार आहोत. गनचे अन्य साहित्यही टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल. गन मिळाल्याने वन्यप्राण्यांच्या बचाव मोहिमेला मदत होणार आहे.
थर्मल ड्रोन व कॅमेराही घेणार
दरम्यान, वन विभागासाठी लवकरच थर्मल ड्रोन व थर्मल कॅमेरेही घेतले जाणार आहेत. वन क्षेत्रात रात्रीच्या छायाचित्रणासाठी त्याचा उपयोग होईल. ठिकठिकाणी बिबट्या आदी वन्यप्राण्यांच्या वावराच्या तक्रारी येतात, तेव्हा त्या भागत थर्मल कॅमेरे किंवा थर्मल ड्रोनद्वारे छायाचित्रे टिपता येतील. प्राणी नेमका कोणता आहे, याची निश्चिती करता येईल. वन विभागाच्या कार्यालयात वन्यप्राणी उपचार केंद्रही लवकरच सुरू होणार आहे.