- शीतल पाटीलसांगली - मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला कामानिमित्त गेलो होतो. आम्ही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतच आहोत, असे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी रविवारी स्पष्ट केले. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादीत संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भूमिका अद्याप अस्पष्ट असून भविष्यातील घडामोडीवर लक्ष ठेवले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षवाढीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे विविध जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे. खुद्द पवार यांनी सांगली जिल्ह्याची जबाबदारी घेतली आहे. यामागे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न असल्याची राजकीय चर्चा आहे. त्यातच गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील पदाधिकारी, नेते, नगरसेवकांना मुंबईतील बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीला माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे उपस्थित होते. पक्षाच्या इतर नगरसेवकांनी मात्र पाठ फिरविली होती.
याबाबत सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. निवडणुका कधी होतील, याचा नेम नाही. तोपर्यंत शहरातील विकासकामे ठप्प होऊ नयेत, यासाठी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन १०० कोटीचा निधी द्यावा, अशी मागणी केली. त्यासाठी मुंबईला गेलो होतो. मंत्रालयात त्यांची भेट झाली नाही. ते राष्ट्रवादी कार्यालयात असल्याचे समजताच तिथे गेलो. तेव्हा सांगलीतील पक्षाचे नेते, पदाधिकारीही उपस्थित होते. अजित पवार यांची भेट घेतली असली तरी ती विकासकामांसाठी होती. आम्ही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतच आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.